स्टार एअरलाइन्स या देशातील आघाडीच्या प्रादेशिक विमान वाहतूक कंपनीने आज सोमवारपासून एस5 169 या क्रमांकाच्या एम्ब्रेयर ई145 विमानाच्या माध्यमातून बेळगाव ते जयपुर हवाई प्रवास सेवा सुरू केली आहे. केवळ जयपूरच नाही तर बेळगावहून बेंगलोर शहरालाही अतिरिक्त विमान फेरी उपलब्ध होणार असल्याने प्रवाशांची चांगली सोय होणार आहे.
बेळगाव विमानतळ हे पश्चिम महाराष्ट्र, उत्तर कर्नाटक व कोंकण यांच्यामध्ये असल्यामुळे प्रवाशांचा मोठा प्रतिसाद मिळतो यामुळेच देशातील महत्त्वाच्या शहरांना या दोन विमान सेवा दिल्या जात आहेत मध्यंतरीच्या काळात उडान योजनेचा कार्यकाळ संपल्याने बऱ्याच विमानसेवा बंद झाल्या यामुळे प्रवाशांमध्ये नाराजी होती. आता स्टार एअरने बेळगाव -जयपुर आणि बेळगाव -बेंगलोर या मार्गावर आठवड्यातून तीन दिवस विमान फेरी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. आठवड्यातील सोमवार, बुधवार व शुक्रवार असे तीन दिवस या दोन्ही शहरांना विमानसेवा दिली जाणार आहे. बेळगाव -जयपुर विमान संबंधित दिवशी दुपारी 12:55 वाजता बेळगावहून प्रस्थान करेल आणि जयपूर येथे दुपारी 3:10 वाजता पोहोचेल. परतीच्या मार्गावर हे विमान दुपारी 3:40 वाजता जयपूरहून उड्डाण करेल आणि सायंकाळी 5:55 वाजता बेळगावला पोहोचेल. बेळगाव -बेंगलोर मार्गावरील विमान संबंधित दिवशी सकाळी 11:25 वाजता बेंगलोरहून उड्डाण करेल आणि बेळगावला दुपारी 12:30 वाजता पोहोचेल. तसेच बेळगाव येथून सायंकाळी 6:20 वाजता प्रस्थान करून बेंगलोर येथे 7:30 वाजता पोहोचेल. बेळगाव -जयपुर ही हवाई प्रवास सेवा एस5 169 या क्रमांकाच्या एम्ब्रेयर ई145 या विमानाच्या माध्यमातून दिली जाणार आहे. या विमानात प्रशस्त 1- 2 अशा पद्धतीची 50 आसनांची व्यवस्था आहे.
माझ्या मते हवाई मार्गे बेळगाव आणि जयपूर शहराला जोडणे हे फक्त भौगोलिक दृष्ट्या दोन्ही शहरांमध्ये सेतू बांधणे इतपत मर्यादित नाही, तर कनेक्टिव्हिटी वाढवणे आणि नव्या संधी निर्माण करणे हा यामागचा हेतू आहे. बेळगाव आणि जयपूर या दोन्ही शहरांची अफाट आर्थिक आणि संस्कृतीत प्रगती व्हावी यासाठीचा हा प्रयत्न आहे, असे स्टार एअरचे संचालक श्रेणिक घोडावत यांनी स्पष्ट केले आहे.
बेळगाव आणि जयपूर ही देशातील सांस्कृतिक दृष्ट्या अतिशय समृद्ध अशी शहरे असून जी मोठ्या प्रमाणात पर्यटकांना आकर्षित करू शकतात. या दोन शहरांना जोडणारी नवी विमान सेवा सुरू केल्यामुळे या शहरांमधील विद्यार्थी, व्यापारी, उद्योजक, काम करणारी मंडळी अशा सर्वांसाठी प्रगतीचे नवे द्वार खुले होणार आहे, असेही ते म्हणाले.