वळीव पावसाने नुकतीच चांगली हजेरी लावल्यामुळे शेतकरी सुखावला असून रोहिणी नक्षत्राच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागात पेरणीपूर्व मशागतीच्या कामांसह धूळवाफ पेरणीला प्रारंभ झाला आहे.
यंदा जूनच्या दुसऱ्या आठवड्यापासून मान्सूनला सुरुवात होणार आहे. त्यामुळे शेतकरीवर्ग पेरणीसाठी शेती तयार करण्याच्या प्रयत्नात होता. मात्र खरीप हंगाम तोंडावर आला असताना वळीव पावसाने ओढ दिल्यामुळे पेरणीपूर्व मशागतीची कामे खोळंबली होती.
तथापि आता सोमवारी रात्री वळीवाने समाधानकारक हजेरी लावल्यामुळे चिंताग्रस्त बनलेला शेतकरी सुखावला आहे.
सध्या खोळंबलेली पेरणीपूर्व मशागतीची कामे आणि धुळवाफ पेरणी करण्यामध्ये शेतकरी शेतात व्यस्त असल्याचे पहावयास मिळत आहे. बैलजोडी तसेच ट्रॅक्टरच्या सहाय्याने मशागतीची कामे हाती घेण्यात आली आहेत.
एकाच वेळी सर्वत्र मशागतीची कामे सुरू झाल्यामुळे बैलजोडी तसेच ट्रॅक्टर पॉवर टिलरच्या मागणीत वाढ झाली आहे.
बेळगाव तालुक्यात रोहिणी नक्षत्राच्या मुहूर्तावर धूळ वाफ पेरणीला सुरुवात झाली आहे. बेळगाव तालुक्यातील विविध भागातील शिवारात मशागतीच्या कामाला वेग आला असून नांगरणे, कोळपणे आदी कामाची सुरुवात झाली आहे. ढगाळ वातावरणामुळे दोन दिवस आधीच शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात केली असून बेळगाव तालुक्यात शेतीच्या कामाला वेग आला आहे.
मान्सून जसजसा जवळ येतो तसतशी शेतातील कामाची लगबग मोठ्या प्रमाणात चालू होते. विविध भागात विविध पद्धतीने शेती केली जाते. बेळगावमध्ये रोहिणी नक्षत्राच्या मुहूर्तावर खरीप हंगामातील भातपिकासाठी धूळ वाफ पेरणी केली जाते. रोहिणी नक्षत्राच्या मुहूर्तावर धूळवाफ पेरणी केल्यामुळे या नक्षत्रावर होणाऱ्या पावसामुळे पिकांची चांगल्या प्रकारे वाढ होते तसेच लवकर पेरणी झाल्यामुळे पिकांची उंची वाढते. जून महिन्यानंतर वर्षा ऋतूमध्ये पिकाची प्रतिकार शक्ती वाढते त्यामुळे शेतकऱ्यांसाठी धूळ वाफ पेरणी हि महत्वाची मानली जाते.