बेळगाव लाईव्ह : कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे निकाल आज जाहीर होत असून सकाळी ८ पासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. राज्यभरात काँग्रेसची एक हाती सत्ता स्थापन होईल, असे चिन्ह स्पष्ट होत असून संपूर्ण राज्याचे लक्ष वेधलेल्या बेळगावमधील १८ मतदार संघापैकी १३ मतदार संघात देखील काँग्रेसच आघाडीवर आहे.
सर्वाधिक चुरशीने लढत झालेल्या दक्षिण विधानसभा मतदार संघात भाजपचे आमदार अभय पाटील ७६२४९ मतांनी विजयी ठरले आहेत. तर भाजप आमदारांना तगडी टक्कर देणारे महाराष्ट्र एकीकरण समितीचे रमाकांत कोंडुसकर हे ६४४८७ मते मिळवून पराभूत झाले आहेत. खानापूर तालुक्यात भाजपचे विठ्ठल हलगेकर यांनी काँग्रेसच्या अंजली निंबाळकर यांचा पराभव केला आहे.
बेळगाव उत्तर मतदार संघात भाजप आणि काँग्रेसमध्ये अत्यंत चुरस सुरु असून बेळगाव ग्रामीण मतदार संघात भाजपचे नागेश मन्नोळकर हे अत्यंत पिछाडीवर आहेत तर काँग्रेसच्या लक्ष्मी हेब्बाळकर या आघाडीवर आहेत. दुसऱ्या क्रमांकावर समितीचे आर. एम. चौगुले आहेत.
अथणी मतदार संघाचे लक्ष्मण सवदी यांनी एकहाती वर्चस्व सिद्ध केले असून निपाणी मतदार संघात भाजपच्या शशिकला जोल्ले आणि राष्ट्रवादीचे उत्तम पाटील यांच्यात मतांची जोरदार चुरस सुरु आहे. गोकाक मतदार संघातून भाजपचे किंगमेकर मानले जाणारे रमेश जारकीहोळी आणि महांतेश कडाडी यांच्यात चुरस सुरु असून काही फेऱ्यांमध्ये पिछाडीवर असलेले रमेश जारकीहोळी पुन्हा आघाडीवर आले आहेत.
बेळगावच्या राजकारणात काँग्रेसचे सतीश जारकीहोळी किंगमेकर ठरत असून स्वतःच्या विजयाचे खाते उघडतच बेळगावमध्ये सर्वाधिक जागांवर काँग्रेस उमेदवारांना निवडून आणण्यासाठी त्यांनी कम्बर कसली होती. त्यांच्या प्रयत्नांना यशाची साथ मिळाली असून बेळगावमध्ये १३ जागांवर काँग्रेस सर्वाधिक आघाडीवर असल्याचे चित्र आहे.