महाराष्ट्र एकीकरण समितीने आपला प्रचार जरूर करावा. मात्र राष्ट्रीय पक्ष म्हणून आम्हाला आमची भूमिका मांडावी लागणार आहे असे मत महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केले आहे.
काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारासाठी आज गुरुवारी बेळगावात दाखल झाल्यानंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण म्हणाले की, बेळगावमध्ये मोठ्या प्रमाणात मराठी भाषिक आहेत. त्यामुळे येथील लोकांच्या भावना लक्षात घेऊन काँग्रेसने पुन्हा डॉ. अंजली निंबाळकर, लक्ष्मी हेब्बाळकर वगैरेंना पुन्हा उमेदवारी दिली आहे. कारण त्यांना फक्त मराठी भाषिक नव्हे तर सर्वांचे समर्थन आहे. लोकांच्या भावना लक्षात घेऊन काँग्रेसने ज्यांना उमेदवारी दिली आहे, त्या सर्वांनी गेल्या 5 वर्षात काम देखील चांगले केले आहे. फक्त मराठी नाहीतर इतर वर्गही त्यांना मानतो.
कर्नाटकातील निवडणुकीत सत्तेसाठी काँग्रेसची निधर्मीय जनता दल, महाराष्ट्र एकीकरण समिती वगैरे कोणाशीही युती नाही. राष्ट्रीय पक्ष म्हणून आम्ही निवडणूक लढवत आहोत आणि येथील सर्व समाजाला न्याय मिळवून देणे ही आमची भूमिका असणार आहे, असे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केले.
सीमाप्रश्नासंदर्भात बोलण्यास नकार देऊन आम्ही पक्ष म्हणून निवडणूक लढवत आहोत आणि येथील सर्व समाजाला न्याय मिळवून देण्याची भूमिका आमची राहणार आहे. मला वाटतं मूळ विषयाला बगल देण्यासाठी इतर विषय काढले जात आहेत. आपला मूळ विषय काय आहे? तर भाजपच्या मागील 5 वर्षाच्या कार्यकाळाबद्दल कोण प्रत्युत्तर देणार. रोजगार निर्मितीचा प्रश्न आहे. स्थानिक प्रशासन ढासळत आहे. महागाईचा विषय आहे, मात्र हे सोडून भलतंच बोललं जात आहे हे योग्य नाही. मागील वेळी मराठी भाषिकांनी काँग्रेसला मत दिली होती. यावेळीही त्यांना कळतंय की भाजपशी कोण लढू शकतो तर ते काँग्रेस आहे. आज फडणवीस यांना काळे झेंडे दाखवण्याचा इशारा देण्यात आला याचा अर्थ सर्वांना माहित आहे की भाजप नुसते बोलते. त्यामुळे उलट काँग्रेसचेच प्रशासन योग्य आहे अशी येथील लोकांची भावना आहे, असे चव्हाण म्हणाले.
कर्नाटकात आमची कोणाशीही युती नाही राष्ट्रीय पक्ष म्हणून आमची एक वेगळी संभावना आहे असे सांगून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी काँग्रेसचे नाव घेऊन ज्या पचास खोक्यांचा उल्लेख केला आहे तो महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी संबंधित आहे त्या पचास खोक्यांशी महाराष्ट्र काँग्रेसचा काहीही संबंध नाही, असे चव्हाण यांनी स्पष्ट केले
आज काँग्रेस पक्ष धर्मनिरपक्षतेची भलावना करत आहे. कारण धर्माच्या नावावरच भारतीय जनता पक्ष स्वतःचा स्वार्थ साधत आहे. तेंव्हा कर्नाटकात यावेळीही भाजपने धर्माचा फायदा उठवू नये यासाठी आमचे प्रयत्न आहेत असे सांगून कर्नाटकातील भाजप सरकारच्या आरक्षण प्रक्रियेवर अशोक चव्हाण यांनी जोरदार टीका केली. लिंगायत, वक्कलिग या समाजाचा उल्लेख करताना कर्नाटकातील भाजप सरकारने 2 टक्के आरक्षण इकडे तिकडे वाटल्यामुळे कोणाचेच समाधान झालेले नाही. मुस्लिम समाजही त्यांच्यावर नाराज आहे. आता ध्रुवीकरणाची वेळ आली आहे. भारत सरकारने घटनात्मक दुरुस्ती करून राज्य सरकारांना आरक्षणाचे अधिकार दिले असले तरी आरक्षण मर्यादा 50 टक्क्यावर नसावी अशी मर्यादा घातली आहे. ही मर्यादा हटविण्यात यावी अशी आमची भारत सरकारकडे मागणी आहे. मात्र आरक्षणाचे राजकीय भांडवल करता यावे यासाठी सरकारकडून आमच्या मागणीकडे जाणून-बुजून दुर्लक्ष केले जात आहे, असा आरोप माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केला.