बेळगाव लाईव्ह : महाराष्ट्रातील राष्ट्रीय पक्षांचे नेते आज बेळगावमध्ये आपापल्या पक्षांच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी आले असून समिती उमेदवारांच्या विरोधार्थ ते प्रचारात उतरले आहेत. यामुळे संतापलेल्या समिती कार्यकर्त्यांकडून त्यांचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात येत आहे.
आज सकाळी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची टिळकचौक येथे जाहीर प्रचारसभा आयोजिण्यात आली होती. यावेळीही समिती कार्यकर्त्यांनी काळे निशाण दाखवत जोरदार घोषणाबाजी केली. त्यानंतर आता महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनादेखील बेनकनहळ्ळी येथे काळे निशाण दाखवत तालुका म. ए. समिती युवा आघाडीच्या शेकडो कार्यकर्त्यांनी निषेध व्यक्त केला आहे.
बेनकनहळ्ळी येथे आयोजिलेल्या प्रचारादरम्यान ग्रामीण मतदार संघाच्या काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करत गावात प्रवेश केला. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करताना तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती युवा आघाडीच्या कार्यकर्त्यांनी अशोक चव्हाण यांच्या विरोधार्थ जोरदार घोषणाबाजी करत संयुक्त महाराष्ट्र, सीमाप्रश्नाच्याही घोषणा दिल्या.
कडेकोट पोलीस बंदोबस्तात बेनकनहळ्ळी येथे आयोजिलेल्या प्रचारादरम्यान गावातील शेकडो महिलांनी आपापल्या घरासमोरून अशोक चव्हाणांच्या विरोधात घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडला. यावेळी अशोक चव्हाण यांच्यासोबत सतेज उर्फ बंटी पाटील हेदेखील उपस्थित होते.
आज सकाळी देवेंद्र फडणवीस यांच्या प्रचार सभेदरम्यान म. ए. समिती कार्यकर्त्यांनी काळे निशाण दाखवून त्यांचा तीव्र निषेध केला. हि बाब लक्षात घेत बेनकनहळ्ळी येथे कडेकोट पोलीस बंदोबस्तात अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत प्रचाराचे आयोजन करण्यात आले होती.बेनकनहळ्ळी भागातील रस्त्यांवर ठेवण्यात आलेल्या बंदोबस्तामुळे प्रचाराऐवजी वेगळेच वातावरण तयार झालेले पाहायला मिळाले. परंतु पोलिसी दडपशाहीला न जुमानता शेकडो समिती कार्यकर्त्यांनी आणि महिलांनी जोरदार घोषणाबाजी करत आपला संताप व्यक्त केला.
सीमाप्रश्नी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री दिवंगत यशवंतराव चव्हाण यांनी मोठे योगदान दिले आहे. मात्र अशोक चव्हाण यांनी सीमाभागात समिती आणि मराठी भाषिकांच्या विरोधार्थ प्रचाराला येऊन मराठी भाषिकांचा रोष ओढवून घेतला आहे.