बेळगाव कृषी उत्पन्न बाजार समिती अर्थात एपीएमसी येथील भाजी मार्केट येथील व्यापाऱ्यांनी आज सोमवारी बेंगलोर मुक्कामी यमकनमर्डीचे आमदार आणि नवनिर्वाचित कॅबिनेट मंत्री सतीश जारकीहोळी यांची भेट घेऊन अभिनंदन केले.
शहरातील एपीएमसी मार्केट आणि गांधीनगर जवळील जय किसान भाजी मार्केट यांच्यातील संघर्ष आता पुन्हा सुरू होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. जय किसान भाजी मार्केटमुळे ग्राहक संख्या रोड आलेल्या एपीएमसी भाजी मार्केटची परिस्थिती सध्या बिकट बनली आहे प्रशासनाने जय किसान भाजी मार्केट सुरू करण्यास परवानगी देऊन आपल्यावर अन्याय केला आहे असा आरोप करत गेल्या तीन-चार वर्षापासून एपीएमसी येथील व्यापारी सातत्याने आंदोलन करून न्यायाची मागणी करत आहेत.
मात्र तत्कालीन भाजप सरकारच्या कारकिर्दीत त्यांच्या आंदोलनाची गांभीर्याने दखल घेण्यात आली नाही. दरम्यान त्या काळात आमदार सतीश जारकीहोळी यांनी एपीएमसी येथील व्यापाऱ्यांना न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते.
आता सध्या राज्यात काँग्रेस सरकार अस्तित्वात आले असल्यामुळे तसेच जारकीहोळी यांना मंत्रिपद मिळाल्याने त्यांचे अभिनंदन करण्याबरोबरच त्यांना त्यांच्या आश्वासनाची आठवण करून एपीएमसी भाजी मार्केट व्यापाऱ्यांनी तडक बेंगलोर गाठले आहे.
सदर व्यापाऱ्यांनी बेंगलोर येथे आज मंत्री सतीश जारकीहोळी यांची यांची भेट घेतली आणि त्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. त्याचप्रमाणे एपीएमसी भाजी मार्केटच्या सध्या परिस्थितीबद्दल त्यांना थोडक्यात माहिती दिली.
याप्रसंगी असिफ कलमनी, बसनगौडा पाटील, सतीश पाटील, अर्जुन नाकाडी, एम. वाय. पाटील, संदीप अंबोजी, सुरेश मोदगेकर आदी व्यापारी उपस्थित होते.