बेळगाव लाईव्ह: राष्ट्रीय पक्ष आणि राष्ट्रीय पक्षांच्या स्टार प्रचारकांच्या दौऱ्याची वेगळीच चर्चा नेहमीच पाहायला मिळते. पण सीमाभागात सध्या सर्वत्र समितीमय वातावरण निर्माण झाले असून यत्र-तत्र-सर्वत्र समितीचीच हवा वाहत असलेली अनुभवायला मिळत आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या चारही उमेदवारांच्या प्रचारात कार्यकर्त्यांमध्ये तुफान उत्साह संचारला असून प्रचाराची धास्ती कदाचित विरोधकांनीही घेतली आहे.
बुधवारी क्रेनच्या साहाय्याने दक्षिण विधानसभा मतदार संघाचे उमेदवार रमाकांत कोंडुसकर यांना भव्य पुष्पहार घालून आपले समितीप्रेम दाखविण्यात आले. त्यापाठोपाठ आता येळ्ळूर मधील एका युवकानेही समितीनिष्ठ दाखवत चक्क आपल्या हातावर समितीचे नाव आणि भगवा गोंदवून घेतला आहे. समितीवरील दिवसेंदिवस कार्यकर्त्यांचे वाढत चाललेले प्रेम आणि राष्ट्रीय पक्षांच्या वळचणीला गेलेल्या तरुणांचा वाढता ओढा पाहता समितीला पुन्हा एकदा सोन्याचे दिवस आले आहेत.
येळ्ळूर मधील निरंजन नारायण दळवी नामक युवकाने आपल्या हातावर MES असा टॅटू आणि याचबरोबर भगवा ध्वज गोंदवून घेऊन आपली समितीनिष्ठा दाखवून दिली आहे. या तरुणाचा व्हिडीओ सीमाभागात प्रचंड वायरल झाला असून दिवसभर या व्हिडिओची चर्चा सोशल मीडियावर सुरु होती.
येत्या १० मे रोजी कर्नाटक विधानसभा निवडणुका होऊ घातल्या आहेत. निवडणुकीच्या निकालानंतर जो विजयाचा गुलाल उधळल्यानंतर उत्साह दिसून येतो तसा उत्साह सध्या सीमाभागात सर्वत्र दिसून येत आहे.
प्रचारासाठी शेकडोंच्या संख्येने हजर राहणारे कार्यकर्ते, मराठी, सीमाप्रश्न आणि समिती यासंदर्भातील जोरदार घोषणा, भगवे झेंडे आणि महिलांचा लक्षणीय सहभाग यामुळे प्रचारादरम्यान चैतन्यदायी वातावरण पहायला मिळत आहे.