अपवाद वगळता नेहमी मिजाशीत वावरणारे नेते निवडणूक काळात नम्रतेचा बुरखा पांघरून मताची याचना करत फिरत असतात. अनेक मतदारसंघात महिलांच्या मतावर त्यांचा विश्वास असतो. वास्तविक महिला घरात आपल्या पती अथवा कुटुंबातील पुरुष प्रमुखांना विचारून त्यांच्या सूचनेप्रमाणे मतदान करत असतात. बेळगाव जिल्ह्यात 26.5 टक्के महिलांकडून कुटुंबातील सदस्यांशी चर्चा करूनच मतदान होत असल्याचे सर्वेक्षणात स्पष्ट झाले आहे.
निवडणूक आयोगाने केलेल्या सर्वेक्षणामध्ये राज्यातील 33 टक्के महिला पती अथवा घरातील सदस्यांच्या सूचनेप्रमाणे मतदान करतात हे वास्तव समोर आले आहे. पूर्वीच्या काळी मतदानाला जाताना अशीच पद्धत होती असे सांगितले जाते. वास्तविक कालानुरूप आधुनिक विचारसरणीनुसार खरंतर यात बदल व्हावयास हवा. महिलांनी स्वतःचे निर्णय स्वतः घ्यावयास हवेत. मात्र आज देखील अनेक भागात महिलांकडून कुटुंबप्रमुखांच्या संमतीने मतदान करण्याचे प्रमाण अधिक आहे. ग्रामीण महिलांमध्ये निवडणूक आयोगाकडून विशेष जागृती उपक्रम राबविले जात असले तरी त्याला अद्याप यश आलेले नाही. आज देखील महिला आपल्या घरातील सदस्यांच्या सल्ल्यानुसार मतदान करत असल्याचे आयोगाच्या सर्वेक्षणातून पुढे आले आहे.
सर्वेक्षणामध्ये 18 मतदारसंघ असलेल्या बेळगाव जिल्ह्यात 26.5 टक्के महिला कुटुंबातील सदस्यांशी चर्चा करून मतदान करतात. गुलबर्गात हे प्रमाण 23.5 टक्के असून म्हैसूर भागात हे प्रमाण 23 टक्केपर्यंत आहे राज्यात विभागनिहाय 4,452 कुटुंबातून याचा सर्व्हे केला गेला आहे.
यामध्ये सर्व जातींच्या कुटुंबांचा समावेश केला आहे. चार विभागात 44 जणांच्या पथकाने काम केले आहे. या सर्वेक्षणाची माहिती देण्यासाठी 90 टक्के महिलांनी स्वतःहून मते मांडली आहेत. घरात सल्ला घेऊन मतदान करणाऱ्या महिलांचे प्रमाण 2018 मध्ये 33.5 टक्के होते. आता यंदाच्या निवडणुकीत त्यात फरक पडेल असा विश्वास निवडणूक आयोगाला आहे.