विधानसभा निवडणुकीसाठी बेळगाव जिल्ह्यात एकूण 4 हजार 439 मतदान केंद्रांची स्थापना करण्यात येणार असून त्यामध्ये 1 हजारहून अधिक मतदार असलेल्या पाच मतदान केंद्रांचा समावेश असणार आहे. तसेच निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचीनुसार ‘क्रिटिकल’ मतदान केंद्रे ठरविण्यात येणार आहेत, अशी माहिती जिल्हा निवडणूक निर्वाचन अधिकारी तथा जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी दिली.
शहरातील व्हीटीयु विद्यापीठाच्या सिनेट सभागृहामध्ये काल रविवारी पार पडलेल्या जिल्ह्यातील निवडणूक निरीक्षकांच्या बैठकीत ते बोलत होते. जिल्ह्यातील प्रत्येक मतदारसंघात सखी मतदान केंद्र, दिव्यांगांसाठी व संपूर्ण महिलांसाठी कार्यरत असणाऱ्या मतदान केंद्रांची स्थापना करण्यात येणार आहे.
यापूर्वी जाहीर केल्याप्रमाणे येत्या 29 एप्रिल ते 1 मे पर्यंत तीन दिवस 80 वर्षावरील वयस्क मतदार आणि दिव्यांग मतदारांची मते घरोघरी जाऊन संकलित केली जाणार आहेत. गेल्या 20 एप्रिलच्या नोंदीनुसार संपूर्ण जिल्ह्यात 39 लाख 47 हजार 150 मतदार असून अंतिम मतदार यादी लवकरच जाहीर करण्यात येईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
निवडणुकीसाठी एमसीसी नोडल अधिकाऱ्यांसह विविध पथकांची स्थापना करण्यात आली आहे. ही सर्व पथके आचारसंहिता लागू झाल्यापासून कार्यरत असून आत्तापर्यंत 15 टक्के वेब कास्टिंग करण्यात आले आहे. जिल्ह्यातील 500 हून अधिक मतदान केंद्रांवर वेब कास्टिंगची व्यवस्था करण्यात आली असून 17 कोटी रुपयांहून अधिक मालमत्ता जप्त करण्यात आली आहे अशी माहितीही जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी दिली.
बैठकीस अप्पर जिल्हाधिकारी के. टी. शांतला पोलीस, आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या, जिल्हा पोलीस प्रमुख डॉ. संजीव पाटील, दिनेशकुमार यादव, श्रीमती शेमुशी यांच्यासह संबंधित अधिकारी आणि सर्व निवडणूक निरीक्षक उपस्थित होते.