बेळगाव लाईव्ह : मतदारांना आकर्षित करण्यासाठी आता एटीएम आणि पॅन कार्डप्रमाणे प्लास्टिक कार्डच्या स्वरुपात ओळखपत्र तयार केले जात आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून यापुढे निवडणूक ओळखपत्र पीव्हीसी एपिक कार्ड स्वरुपात प्राप्त होणार आहे. हे कार्ड एटीएम कार्डप्रमाणेच प्लास्टिक स्वरुपातील असेल.
राज्यात अजूनही नव्या मतदारांची नावे मतदार यादीत समाविष्ट केली जात आहेत. मतदारनोंदणी केलेल्यांना निवडणूक ओळखपत्र पोस्टाद्वारे घरपोच पाठविले जात आहे.
पूर्वी निवडणूक आयोगाकडून निवडणूक ओळखपत्र मंजूर करताना ते कागदावर प्रिंट काढून लॅमिनेशन करून दिले जात होते; पण केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतलेल्या या निर्णयामुळे नव्या स्वरुपातील हे ओळखपत्र नव मतदारांना आकर्षित करत आहे.
राज्यात एकूण ५ कोटी २१ मतदार आहेत. यंदा राज्यात नऊ लाख मतदार पहिल्यांदा आपला हक्क बजावणार आहेत. त्यामधील ९९ विधानसभा मतदारसंघातील ३ लाख ३८ हजार मतदारांना नवीन निवडणूक ओळखपत्र प्राप्त झाले आहे.
पुढील आठवड्याभरात आणखी २० लाख ४७ हजार मतदारांना ते प्राप्त होणार आहे. आतापर्यंत निवडणूक आयोगाकडून १७ लाख ७६ हजार मतदान कार्डाचे मुद्रण झाले आहे. पूर्वी जिल्हा किंवा तालुका पातळीवरील निवडणूक विभागाच्या कार्यालयात जाऊन कार्ड मिळवावे लागत होते. आता थेट पोस्टाने नवे कार्ड पाठविले जात आहे.