बेळगाव शहराचा मास्टर प्लॅन जीआयएस तंत्रज्ञानाचा वापर न करता ऑटोकॅड तंत्रज्ञान वापरून तयार केला जाणारा असून बेळगाव नगर विकास प्राधिकरणाने (बुडा) या कामाची जबाबदारी हुबळी येथील व्हिजन सोल्युशन्स या कंपनीवर सोपवली आहे.
केंद्र शासनाच्या अमृत योजनेतून जीआयएस जिओग्राफिक इन्फॉर्मेशन सिस्टीम या तत्त्वावर राज्यातील प्रमुख शहरांचा मास्टर प्लॅन तयार केला जात आहे. बेळगाव शहराचा मास्टर प्लॅन देखील जीआयएस तंत्रज्ञानाचा वापर करूनच केला जाणार होता.
या कामाचे कंत्राटही ईजीआयएस कंपनीला मिळाले होते. मात्र या कंपनीचे कंत्राट रद्द झाल्यानंतर नवा कंत्राटदार नियुक्त करण्याची जबाबदारी नगर विकास खात्याने बुडा प्रशासनावर सोपविली होती.
त्या अनुषंगाने बुडाने निविदा प्रक्रिया राबवून बेळगावचा मास्टर प्लॅन तयार करण्याची जबाबदारी व्हिजन सोल्युशन्स या कंपनीला दिली आहे. तथापि मास्टर प्लॅनसाठी ऑटोकॅड तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे.
हुबळी, धारवाड, गदग तसेच राज्यातील अन्य शहरांमध्ये जीआयएस तंत्रज्ञानाचा वापर केला जात असताना बेळगाव मात्र जुन्या ऑटोकॅडचाच वापर केला जात असल्यामुळे सखेद आश्चर्य व्यक्त होत आहे. बेळगाव शहराचा सध्याचा मास्टर प्लॅन ऑटोकॅडच्या माध्यमातूनच तयार करण्यात आला आहे.
या तंत्रज्ञानाचा वापर करून प्राधिकरणाच्या कार्यक्षेत्राचा केवळ आराखडा तयार केला जातो. त्यात प्राधिकरण क्षेत्रातील भू वापर व अन्य माहिती वेगवेगळ्या रंगांच्या सहाय्याने दर्शविले जाते. याउलट जीआयएस तंत्रज्ञानामुळे कार्यक्षेत्रातील प्रत्येक मिळकतीची माहिती उपलब्ध होऊ शकते. त्यातील प्रत्येक मिळकतीचा बेस मॅप तयार करता येऊ शकतो.
त्यामुळेच जीआयएस तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तथापि बेळगाव शहर विकास प्राधिकरणाने हा निर्णय बाजूला सारून जुन्या पद्धतीनेच मास्टर प्लॅन तयार केला आहे. सर्वत्र आधुनिक पद्धत वापरली जात असताना मास्टर प्लॅन तयार करण्यासाठी जुन्या पद्धतीचाच वापर करण्याच्या बुडाच्या या उरफाट्या निर्णयाबद्दल नागरिकात उलट सुलट चर्चा होत आहे.