बेळगाव आणि बागलकोट जिल्ह्यातील कृष्णा नदी काठावर असलेल्या गावांमध्ये आगामी कांही दिवसांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे.
यासाठी महाराष्ट्रातून कृष्णा नदीवरील हिप्परगी बॅरेज अर्थात बंधाऱ्यात 2 टीएमसी ज्यादा पाणी सोडण्यात यावे. त्यासाठी सरकार पातळीवर आवश्यक क्रम घेणे अगत्याचे आहे, असे प्रादेशिक आयुक्त डॉ. बगादी गौतम यांनी एका विनंती पत्राद्वारे राज्य सरकारला कळविले आहे.
सध्याची परिस्थिती पाहता बेळगाव आणि बागलकोट जिल्ह्यातील कृष्णा काठावर असलेल्या गावांमध्ये आगामी कांही दिवसांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे.
त्यामुळे लोकांचे आणि जनावरांचे पाण्याविना हाल होणार असल्यामुळे महाराष्ट्र राज्यातील वारणा /कोयना जलाशयांमधून 2 टीएमसी इतके ज्यादा पाणी लवकरात लवकर कृष्णा नदीमार्गे हिप्परगी बॅरेजमध्ये सोडणे अत्यावश्यक असल्याचे डॉ. बगादी यांनी आपल्या विनंती पत्रात नमूद केले आहे.
पिण्याच्या पाण्याची अत्यंतीक गरज लक्षात घेऊन कर्नाटक पाटबंधारे निगम उत्तर वलयाचे मुख्य अभियंते आणि बागलकोट जिल्हाधिकारी यांनी सादर केलेल्या अहवालाची प्रत देखील प्रादेशिक आयुक्तांनी आपल्या पत्रासोबत जोडली आहे.