वाहतूक नियम भंग प्रकरणी राज्यात मोठ्या प्रमाणात प्रलंबित असलेल्या दंडाच्या वसुलीसाठी ई -चलान तयार करण्याबरोबरच गेल्या फेब्रुवारी आणि मार्च महिन्यामध्ये दहा दिवसांसाठी दंडाच्या रकमेत 50 टक्के सूट देण्यात आली होती. फलस्वरूप बेळगाव शहरात 74,269 गुन्ह्यांप्रकरणी अडकून पडलेला 142.23 लाख रुपयांचा दंड वसूल झाला आहे.
बेळगाव शहरात फेब्रुवारी महिन्यामध्ये पहिल्या वेळी 38,691 वाहतूक नियम भंग गुन्ह्यांप्रकरणी 76.12 लाख रुपये आणि मार्चमध्ये दुसऱ्या वेळी 35,578 वाहतूक नियम भंग गुन्ह्यांप्रकरणी रु. 66.11 लाख इतकी दंडाची रक्कम जमा झाली. वाहतूक नियम भंगा प्रकरणी ई -चलान दंडासाठी गेल्या दोन ते 11 फेब्रुवारीपर्यंत तसेच 4 ते 18 मार्च दरम्यान 50 टक्के सवलतीची ऑफर देण्यात आली होती. वाहतूक नियम भंगाच्या दाखल झालेल्या गुन्ह्यांपैकी बहुतांश गुन्हे हे दुचाकी चालकाने किंवा त्याच्यासोबत असलेल्या सहप्रवाशाने हेल्मेट परिधान न केल्यामुळे नोंदविण्यात आले आहेत.
याखेरीज वाहतूक नियमांच्या इतर सामान्य उल्लंघनांमध्ये ट्रिपल सीट दुचाकी वाहन चालवणे, वाहन चालवताना मोबाईल वापरणे, वाहनाची सदोष नंबर प्लेट आदींचा समावेश आहे. वाहन क्रमांकाच्या आधारे पोलिसांनी क्रम घेत वाहतूक नियम भंग करणाऱ्यांना नोटिसा धाडल्या आहेत.


