बेळगाव ग्रामीण मतदार संघातील महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार आर. एम. चौगुले यांना एपीएमसी मार्केट यार्ड येथील कांदा, बटाटा वगैरे समस्त व्यापारीवर्गाने संपूर्ण जाहीर पाठिंबा दिला असून भरघोस मतांनी निवडून आणण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
बेळगाव ग्रामीणचे महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार आर. एम. चौगुले यांच्या प्रचारार्थ आज शनिवारी सकाळी एपीएमसी मार्केट यार्ड येथे पदयात्रा काढण्यात आली. प्रारंभी मार्केट यार्ड येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे समस्त व्यापारी वर्गातर्फे ज्येष्ठ व्यापारी बाळाराम पाटील आणि एन बी खांडेकर यांनी उमेदवार आर. एम. चौगुले यांचे पुष्पहार घालून स्वागत करण्याबरोबरच त्यांना निवडणुकीसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी बोलताना बाळाराम पाटील आणि खांडेकर यांनी आपल्या भाषणात एपीएमसी मार्केट यार्ड मधील समस्त व्यापारीवर्गाचा बेळगाव ग्रामीणसह बेळगाव दक्षिण, बेळगाव उत्तर, यमकनमर्डी आणि खानापूर येथील महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारांना संपूर्णपणे जाहीर पाठिंबा असल्याचे स्पष्ट केले. विरोधक कितीही बलशाली असले तरी यावेळी मराठी माणूस पेटून उठला असल्याचे सांगून त्यामुळे समिती उमेदवारांचा विजय निश्चित आहे, असा विश्वास व्यक्त केला.
उमेदवार आर. एम. चौगुले यांनी आपल्या संक्षिप्त छोट्या भाषणात मार्केट यार्डमध्ये शेतकरी बांधवांचा संपर्क मोठा आहे. खास करून मी ज्या मतदारसंघातून निवडणूक लढवत आहे तेथे बहुसंख्य शेतकरी बांधव आहेत. आजतागायत एपीएमसी मार्केट यार्ड येथील समस्त व्यापाऱ्यांनी महाराष्ट्र एकीकरण समितीला प्रत्येक उपक्रमात आणि निवडणुकीमध्ये खंबीर साथ दिली आहे. यावेळी देखील ती लाभणार असल्यामुळे समितीचा विजय निश्चितपणे होणार असा मला विश्वास आहे, असे सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व्यापारी माणिक होनगेकर यांनी केले.
याप्रसंगी माजी महापौर शिवाजी सुंठकर, म. ए. समितीचे कायदा सल्लागार व बेळगाव बार असोसिएशनचे उपाध्यक्ष ॲड. सुधीर चव्हाण, यल्लाप्पा चव्हाण, गुंडू पाटील, सोमनाथ पाटील, श्रीनिवास चव्हाण, टी. एस. पाटील, संभाजी होनगेकर, दीपक होनगेकर, आर. आय. पाटील, एल. एस. होनगेकर, बसवंत मायाण्णाचे, मोहन बेळगुंदकर, अशोक बामणे, संजय चौगुले, बाबुराव बामणे, राजू पाटील, राजू काकती, किरण जाधव, सिद्धार्थ नरेगावी, अभिजित मोरबाळे, प्रशांत पाटील, प्रविण चांदीलकर, प्रशांत झंगरुचे यार्डातील बहुसंख्य व्यापारी उपस्थित होते. या सर्वांनी आर. एम. चौगुले यांना एकमुखी पाठिंबा व्यक्त केला.
उमेदवार आर. एम. चौगुले यांची आज संपूर्ण एपीएमसी मार्केट यार्डमध्ये प्रचार पदयात्रा काढण्यात आली. पदयात्रेत समितीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि व्यापारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. प्रचार पदयात्रेदरम्यान उमेदवार चौगुले यांनी तेथील कांदा -बटाटा मार्केट, गुळ -रताळी मार्केटमधील व्यापाऱ्यांच्या गाठीभेटी घेऊन आपल्याला मतदान करण्याची विनंती केली. तसेच जनावराच्या बाजाराच्या ठिकाणी पशुपालक व शेतकऱ्यांच्या भेटी घेतल्या. यावेळी त्या सर्वांनी त्यांना संपूर्ण पाठिंबा देऊन बहुमताने निवडून आणण्याचा निर्धार व्यक्त केला. कांदा, बटाटा व्यापारी संघटनेने तर आपल्या वार्ता फलकाच्या माध्यमातून आर. एम. चौगुले, रमाकांत कोंडुसकर व ॲड. अमर येळ्ळूरकर या म. ए. समितीच्या उमेदवारांना जाहीर पाठिंबा व्यक्त केला आहे.