बेळगाव लाईव्ह : खानापूर भागात सुरु करण्यात आलेले बेळगाव – लोंढा चौपदरीकरणाचे काम हाती घेण्यात आले असून हे काम अद्यापही अपूर्ण अवस्थेत असून रखडलेल्या कामामुळे जनता हैराण होत आहे.
अशातच आता गणेबैल येथे टोलनाका सुरु करण्याची तयारी सुरु करण्यात आली आहे, अशी माहिती उपलब्ध झाली आहे. गणेबैल येथे टोलनाका सुरु करण्याचा प्रस्ताव पुढे आला असून लवकरच टोल आकारण्यास सुरुवात केली जाण्याची शक्यताही वर्तविण्यात येत आहे.
टोलनाक्याच्या या माहितीमुळे खानापूर भागातून प्रवास करणाऱ्या नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी व्यक्त केली जात असून अर्धवट स्थितीत रस्त्याचे कामकाज असूनही टोल कसा काय आकारला जाऊ शकतो? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
या महामार्गाची लांबी ३० किलोमीटर इतकी असून ४० किलोमीटरच्या आतील पाल्यासाठी टोल आकारला जात नाही. मात्र गणेबैल येथे उभारण्यात आलेल्या टोलनाक्यावर टोल कसा काय आकारला जाणार आहे? असे प्रश्न उपस्थित होत आहेत. हा निर्णय जनतेला अंधारात ठेवून घेण्यात येत असल्याचेही आरोप जनतेतून केले जात आहेत.
महामार्गाच्या चौपदरीकरणामुळे आधीपासूनच मेटाकुटीस आलेल्या जनतेला आता टोलनाक्याच्या आर्थिक भुर्दंड सोसावा लागणार आहे. महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी येथील शेतकऱ्यांच्या जमिनी आधीच हडप करण्यात आल्या असून त्याचा मोबदलाही तुटपुंजा देण्यात आला आहे.
या भागातील प्रभूनगर, निट्टूर, काटगाळी, ईदलहोंड, सिंगींनकोप, माळअंकले, झाडअंकले, गणेबैल, हत्तरगुंजी, डुक्करवाडी तसेच खानापूर शहरातून दररोज ये-जा करणाऱ्या स्थानिक वाहनधारकांना दररोज ये-जा करावी लागणार, दररोज दोन फेऱ्या माराव्या लागणाऱ्या वाहनधारकांना टोलनाक्याचा भुर्दंड भरावा लागणार याची चिंता स्थानिक चारचाकी वाहनधारकांना लागली आहे.
या पार्श्वभूमीवर खानापूर तालुक्यातून येणाऱ्या स्थानिक वाहनधारकांची पर्यायी व्यवस्था करण्यात यावी, अशीही मागणी पुढे येत आहे.