बेळगाव लाईव्ह : दहावी परीक्षेची सांगता उद्या होणार असून आता पेपर तपासणीचे काम हाती घेण्याची तयारी करण्यात आली आहे. २४ एप्रिलपासून दहावीच्या पेपर तपासणीला सुरुवात होणार आहे. त्यामुळे मुख्य केंद्रप्रमुखांना २१, तर सहायक मूल्यमापकांना २४ एप्रिलपासून पेपर तपासणी केंद्रावर हजर होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यातील ३३ हजारांहून अधिक विद्यार्थ्यां दहावीची परीक्षा देत आहेत.
बेळगाव शहरासह राज्यातील विविध पेपर तपासणी केंद्रांवर २१ एप्रिलपासून पेपर तपासणी होणार असून २१ एप्रिलला केंद्र प्रमुखांना पेपर तपासणी केंद्रावर पोहचण्याची सूचना केली आहे.
बारावी परीक्षेचे मूल्यमापन अंतिम टप्प्यात आहे त्यामुळे येत्या दोन दिवसांत पेपर तपासणीचे काम पुर्ण होणार आहे. आता पर्यंत दहावीचे पेपर सुरळितरित्या पार पडले आहेत. शेवटचा पेपरही चांगल्या प्रकारे पार पडेल असा विश्वास शिक्षण खात्यातून व्यक्त केला जात आहे.
बेळगाव शहरातील विविध केंद्रांवर सहा विषयांचे पेपर तपासणार आहेत. दहावी परीक्षेचा निकाल वेळेत लागावा यासाठी शिक्षण खात्याने परीक्षा संपलेल्या सात दिवसातच पेपर तपासणीचे काम हाती घेण्याचा निर्णय घेतला होता.
त्यामुळे १५ दिवसांत पेपर तपासणीचे काम पूर्ण केले जाणार आहे. तसेच पेपर तपासणी केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेऱ्याची नजर असणार असून तपासणीचे काम वेळेत पूर्ण व्हावे यासाठी मूल्यमापकांची संख्या वाढवण्यात येणार आहे.