श्रीराम सेना हिंदुस्तानच्या शेकडो कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र एकीकरण समितीमध्ये प्रवेश केला असून त्या सर्वांनी आपला सभासद अर्ज समितीकडे सुपूर्द केला आहे. हे सर्व कार्यकर्ते आता म. ए. समितीचे कार्य करण्यास सज्ज झाले आहेत.
रेल्वे ओव्हर ब्रिज येथील मराठा मंदिर येथे काल शुक्रवारी मध्यवर्तीय महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक पार पडली सदर बैठकीपूर्वी अंघोळ विभागातील श्रीराम सेना हिंदुस्तानच्या उमेश कुऱ्याळकर, श्रीकांत कुऱ्याळकर आदी कार्यकर्त्यांनी समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांची भेट घेतली. तसेच अनगोळ, वडगाव, जुने बेळगाव, धामणे आदी भागातील शेकडो कार्यकर्ते महाराष्ट्र एकीकरण समितीत सक्रिय होण्यास इच्छुक असल्याचे त्यांनी दळवी यांना सांगितले.
तसेच या कार्यकर्त्यांना काम करण्याची संधी द्यावी अशी विनंती केली त्यावेळी अध्यक्ष दीपक दळवी यांनी महाराष्ट्र एकीकरण समिती ही सर्वांची आहे त्यामुळे मराठी भाषा संस्कृती जपण्याच्या लढ्यात ज्यांना सहभागी व्हायचे आहे त्यांनी आमच्यात सहभागी व्हावे असे सांगून तुम्हा युवकांचे कौतुक आहे समितीचे कार्य निष्ठेने करत रहा अशी सूचना दळवी यांनी केली.
याप्रसंगी श्रीराम सेना हिंदुस्तानचे बेळगाव दक्षिणेकडील पदाधिकारी आणि कार्यकर्ते त्याचप्रमाणे मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.
गेल्या दोन वर्षापासून श्रीराम सेना हिंदुस्थानचे अध्यक्ष रमाकांत कोंडूस्कर महाराष्ट्र एकीकरण समितीत सक्रिय आहेत त्या पाठोपाठ शेकडो कार्यकर्ते आता समितीच्या प्रवाहात दाखल होऊ लागले आहेत.