Friday, December 20, 2024

/

शक्तिप्रदर्शनातून दिसली ‘मराठी’ ताकद : आर. एम. चौगुले यांचा उमेदवारी अर्ज सादर

 belgaum

बेळगाव लाईव्ह : राष्ट्रीय पक्षांचा श्वास रोखून ठेवायला लावणारी सीमाभागातील एकमेव संघटना म्हणजेच महाराष्ट्र एकीकरण समिती! गेल्या कित्येक वर्षात बेकीचे ग्रहण लागलेली समिती आता एकीची वज्रमूठ आवळून विजयाच्या दिशेने घोडदौड करत असून याची प्रचिती आज शहरातील रस्त्यांवर पाहायला मिळाली.

बेळगाव ग्रामीण मतदार संघाचे अधिकृत उमेदवार आर. एम. चौगुले यांनी आज भव्य मिरवणुकीच्या माध्यमातून आणि विरोधकांना घाम फुटेल अशा शक्तिप्रदर्शनाने आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. ठिकठिकाणी भगवे ध्वज आणि भगव्या टोप्या परिधान केलेल्या महिला, युवा कार्यकर्ते आणि अबालवृद्धांसहित भव्य गर्दीत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला.

उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी धर्मवीर संभाजी चौकात केवळ महाराष्ट्र समितीने केलेल्या एका आवाहनाला प्रतिसाद देत सकाळी १० वाजल्यापासूनच समर्थकांनी गर्दी करायला सुरुवात केली. एरव्ही विविध गोष्टींचे आमिष देऊन राष्ट्रीय पक्षांना जी गर्दी जमविता आली नाही ती गर्दी केवळ एका स्वाभिमानासाठी आज बेळगावमध्ये जमलेली पहायला मिळाली.

धर्मवीर संभाजी चौकातून सुरु झालेली मिरवणूक कॉलजेरोड़, राणी चन्नम्मा चौक मार्गे पुढे तहसीलदार कार्यालयाकडे रवाना झाली. उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी आर. एम. चौगुले यांनी समिती कार्याध्यक्ष मनोहर किणेकर, आर. आय. पाटील, ऍड. राजाभाऊ पाटील आणि इतर समिती नेत्यांच्या उपस्थितीत धर्मवीर संभाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन करून अभिवादन केले. त्यानंतर जोरदार घोषणाबाजी करत कार्यकर्ते आणि समर्थकांसह मिरवणुकीद्वारे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.Rush rural

यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना आर. एम. चौगुले म्हणाले, विधानसभा निवडणूक हि समिती आणि मराठी जनतेसाठी अतिशय महत्वाची आहे. सीमाभागातील मराठी जनतेचे प्रतिनिधित्व करून येथील जनतेला मिळणारा दुजाभाव आणि दुटप्पीपणाची वागणूक याला वाचा फोडण्यासाठी आणि कर्नाटकचे अत्याचार मोडून काढण्यासाठी आपण हि निवडणूक लढवत आहोत. याचप्रमाणे सीमाभागातील मराठी जनतेसह इतर समाजातील नागरिकांच्या मदतीसाठीही समिती नेहमी प्रयत्नशील, राहील.

या मिरवणुकीत मराठी भाषिक जनतेचा उत्स्फूर्त उत्साह पाहायला मिळाला. जोरदार घोषणाबाजी, भगवेमय वातावरण आणि अबालवृद्धांचा सहभाग सीमाभागात पुन्हा एक नवचैतन्य निर्मान करणारा ठरला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.