बेळगाव लाईव्ह : महाराष्ट्र एकीकरण समितीचे बेळगाव ग्रामीण मतदार संघाचे अधिकृत उमेदवार म्हणून आर. एम. चौगुले यांची निवड झाल्यानंतर त्यांचे मण्णूर गावात भव्य स्वागत करण्यात आले.
विधानसभा निवडणुकीसाठी समितीच्या वतीने त्यांना अधिकृत उमेदवारी जाहीर झाल्यानंतर उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून हि निवडणूक एकजुटीने लढवून आर. एम. चौगुले यांना प्रचंड बहुमतांनी विजयी करण्याचा निर्धार ग्रामस्थांनी केला आहे.
आर. एम. चौगुले यांची अधिकृत उमेदवार म्हणून निवड जाहीर होताच मण्णूर गावासह तालुक्यामध्ये जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले असून, युवा कार्यकर्त्यांनी देखील योग्य उमेदवाराची निवड झाल्याबद्दल समिती पदाधिकाऱ्यांचे आभार व्यक्त केले. त्यानंतर बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, रहेंगे तो महाराष्ट्र मे, नही तो जेल मे, अशा घोषणा देत छत्रपती शिवाजी उद्यानातील शिवाजी महाराजांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
त्यानंतर धर्मवीर संभाजी महाराज चौकातील संभाजी महाराजांच्या मूर्तीला अभिवादन करून हिंडलगा येथील हुतात्मा स्मारकाला भेट देण्यात आली. यानंतर शेकडो कार्यकर्त्यांसह मण्णूरला रवाना झाल्यानंतर ग्रामस्थांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात फटाक्यांची आतशबाजी आणि झांज पथकाच्या दणदणाटात भव्य स्वागत केले.
याप्रसंगी आर एम चौगुले यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन केले. यावेळी बोलताना ते म्हणाले, सीमावासीयांवर होणारा अन्याय विधानसभेपर्यंत पोहोचविण्यासाठी समितीचे आमदार निवडून येणे गरजेचे आहे.
सध्या सीमाभागात समितीसाठी पोषक वातावरण निर्माण झाले असून, सर्वांनी एकनिष्ठेने समितीच्या पाठीशी राहण्याची आवश्यकता आहे. आपल्यावर विश्वास दाखवून ग्रामीण मतदार संघासाठी उमेदवारी दिल्याबद्दल सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व हितचिंतकांचे त्यांनी आभार मानले तसेच समितीच्या तत्वाशी एकनिष्ठ राहून कार्य करण्याची ग्वाही दिली.
यावेळी समिती नेते व उद्योजक आर. आय. पाटील, ऍड. सुधीर चव्हाण, ज्येष्ठ नेते रामचंद्र मोदगेकर, सुरेश राजुकर, एन. के. कालकुंद्री, संजय पाटील, मधुकर चौगुले, टी. के. मंडोळकर, सागर कटगेन्नवर. रामचंद्र कुदेमनीकर. विनायक पावशे. अनिल हेगडे. आंबेवाडी गाम पंचायत अध्यक्ष चेतन पाटील यांच्यासह समिती पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.