बेळगाव लाईव्ह : तरुण कार्यकर्त्यांसह अबालवृद्ध आणि महिलावर्गाच्या लक्षणीय सहभागात दक्षिण विधानसभा मतदार संघाचे म. ए. समितीचे अधिकृत उमेदवार रमाकांत कोंडुसकर यांच्या प्रचाराचा धुराळा उडत आहे.
यादरम्यान रमाकांत कोंडुसकर हे अनवाणी पायांनी प्रचार करत असल्याचे निदर्शनात आले असून यासंदर्भात प्रतिक्रिया देताना, आपण मायभगिनींच्या सन्मानार्थ अनवाणी पायाने प्रचार करत असल्याचे रमाकांत कोंडुसकर यांनी सांगितले.
”आपण गेले २ ते ३ दिवस प्रचार करत असून ज्या ज्या ठिकाणी प्रचारासाठी जात आहे त्या त्या ठिकाणी माता-भगिनी औक्षण करून माझे स्वागत करत आहेत. प्रचार फेरीचे आगमन होताच माझ्या पायावर पाणी घालत आहेत. ज्या सन्मानाने आणि आदराने माझे औक्षण केले जात आहे, मला आशीर्वाद दिले जात आहेत, त्याठिकाणी पायात चप्पल घालणे मला योग्य वाटले नाही.
यामुळे माझ्या मायभगिनींचा अवमान होईल, असे मला वाटत असून त्यांच्या सन्मानार्थ आपण अनवाणी पायाने प्रचार करत असून निवडणूक पार पडेपर्यंत आपण अनवाणी पायानेच प्रचार करणार” असल्याचे रमाकांत कोंडुसकर यांनी सांगितले.
आज मच्छे येथे रमाकांत कोंडुस्कर यांची पदयात्रा आयोजित करण्यात आली होती. मच्छे येथे आयोजिण्यात आलेल्या प्रचारयात्रेच्या माध्यमातून रमाकांत कोंडुस्कर यांनी मतदारांच्या घरोघरी जाऊन मतदारांची भेट घेतली. येत्या निवडणुकीत आपले बहुमोल मत देऊन आपणास बहुमताने विजयी करण्याचे आवाहन रमाकांत कोंडुसकर यांनी केले.
प्रचारादरम्यान ठिकठिकाणी उमेदवार रमाकांत कोंडुसकर यांचे औक्षण करून पुष्पवृष्टी करण्यात आली. याचप्रमाणे रस्त्यावर फटाके फोडून जल्लोषी स्वागत करण्यात आले.
रमाकांत कोंडुसकर यांचा भव्य प्रचार सुरु असून प्रत्येक ठिकाणी ते अनवाणी पायांनी मतदारांची भेट घेत असल्याचे लक्षात आले. त्यांच्यासमवेत असलेल्या अनेक कार्यकर्त्यांनीही रमाकांत कोंडुसकरांसमवेत अनवाणी पायांनीच प्रचार फेरीत सहभाग घेतला.