बेळगाव लाईव्ह : आम आदमी पक्षाने राज्यातील २८ मतदार संघांसाठी उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली असून बेळगाव उत्तर मतदार संघासाठी राजकुमार टोपाण्णावर यांना उमेदवारी घोषित केली आहे. तर बेळगाव निपाणी मतदार संघातून राजेश अण्णासाहेब बसवण्णा आणि सौंदत्ती मतदार संघटवून बापूगौडा पाटील यांना उमेदवारी घोषित करण्यात आली आहे.
राजकुमार टोपाण्णावर हे लिंगायत समाजाचे नेते असून बेळगावमधील अनेक भ्रष्टाचाराच्या घटनांसंदर्भात त्यांनी आवाज उठविला आहे. यासह बेळगावच्या विकासाचा मुद्दा उचलून धरत निवडणुकीपूर्वी त्यांनी वातावरण निर्मितीही केली आहे.
अलीकडेच विविध लिंगायत संघटनांच्या बैठकीत जो पक्ष लिंगायत समाजातील व्यक्तीला उमेदवारी घोषित करेल, त्या पक्षाला संपूर्ण लिंगायत समाज आणि लिंगायत समाजाच्या सर्व संघटनांचा पाठिंबा असेल, असे जाहीर करण्यात आलेहोते. त्यामुळे आता ‘आप’कडून हि राजकीय खेळी चालविण्यात आली असून लिंगायत समाज दिलेल्या शब्दाप्रमाणे या ‘आप’ला पाठिंबा देईल, अशी शक्यता वर्तविली जात आहे.
भाजपकडून विद्यमान आमदार अनिल बेनकेआणि काँग्रेसकडून राजू सेठ यांच्या उमेदवारीवरच शिक्कामोर्तब केले जाणार हे स्पष्ट आहे. मात्र अनिल बेनके हे मराठा समाजाशी आणि राजू सेठ हे मुस्लिम समाजाशी निगडित असल्याने उत्तर मतदार संघात असलेली लिंगायत मते राजकुमार टोपाण्णावर यांच्याबाजूने वळतील का? हे पाहणे उत्कंठावर्धक ठरणार आहे.
हिंदुत्वाच्या मुद्द्यावर निवडणूक लढविणाऱ्या भाजपचा प्रभाव गेल्या २ – ३ निवडणुकीत दिसून आला आहे. मात्र लिंगायत आरक्षणावरून पेटून उठलेल्या लिंगायत समाजाने घेतलेला पवित्रा पाहता राजकुमार टोपाण्णावर यांचे पारडे या निवडणुकीत जड होणार का? हे पाहणेही महत्वाचे ठरणार आहे. उत्तर मतदार संघात लिंगायत मतदार निर्णायक भूमिका बजावतात. आणि हीच बाब हेरून ‘आप’ने राजकुमार टोपाण्णावर यांना उमेदवारी जाहीर केल्याचे स्पष्ट आहे.
बेळगाव दक्षिण आणि बेळगाव ग्रामीण या मतदार संघांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळणार असे चित्र असतानाच लिंगायत मतदारांचा विचार करत ‘आप’कडून देखील उत्तर मतदार संघात युवा नेतृत्वाला उमेदवारी दिल्याने या मतदार संघाची निवडणूक देखील रंगतदार ठरणार असल्याचे चित्र दिसत आहे.