विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बेळगाव पोलिसांनी गुंडांविरुद्ध मोहीम उघडताना कुख्यात रौडीशीटर्सना चांगलाच दणका दिला आहे. शहर पोलीस आयुक्तालय व्याप्तीतील 70 रौडीशीटर्सच्या घरावर छापे मारून पोलिसांनी दोन धारदार हत्यारांसह अन्य शस्त्रे जप्त केली आहेत.
शहरात प्रसार माध्यमांशी बोलताना पोलीस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या यांनी ही माहिती दिली. विधानसभा निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी गेल्या कांही महिन्यांपासून बेळगाव पोलिसांकडून कायदा व सुव्यवस्था अभाधित राखण्यासाठी दक्षता घेतली जात आहे. ठिकठिकाणी छापेमारी, हत्यार बाळगण्यास प्रतिबंध आदी प्रतिबंधात्मक कारवायाच्या स्वरूपात उपाय योजण्यात येत आहेत.
बेळगाव पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील 12 पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील 70 रौडीशीटर्सच्या घरावर छापेमारी करून दडवून ठेवलेल्या हत्यारांचा शोध घेण्यात आला. बेळगाव शहर कायदा व सुव्यवस्था विभागाचे डीसीपी एच. टी. शेखर यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. छाप्यादरम्यान 2 लांब धारदार शस्त्रांसह अन्य शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास सुरू आहे असे पोलीस आयुक्तांनी सांगितले.
छापेमारीच्या कारवाईत डीसीपी शेखर यांच्यासह मार्केट, क्राईम आणि खडेबाजारचे एसीपी आणि पीआय यांचा सहभाग होता. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी कडक उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
दंगलीच्या गुन्ह्यात गुंतलेल्यांची आणि शस्त्रे बाळगणाऱ्यांची पोलीस चौकशी करून झडती घेतली जात आहेत अशी माहिती देऊन एकंदर निवडणूक सुरळीत पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासनाने कंबर कसली असल्याचे पोलीस आयुक्त डाॅ. एम. बी. बोरलिंगय्या यांनी स्पष्ट केले.