राज्यात नुकत्याच पार पडलेल्या पदवी पूर्व द्वितीय वर्षाच्या अर्थात बारावी परीक्षेच्या पेपर तपासणीला येत्या 5 एप्रिलपासून प्रारंभ होणार असून बेळगाव शहरातील पाच केंद्रांमध्ये 400 हून अधिक प्राध्यापक 9 विषयांचे पेपर तपासणार आहेत.
राज्यातील बारावीची परीक्षा गेल्या 9 मार्च रोजी सुरू होऊन 29 मार्च रोजी समाप्त झाली. सदर परीक्षेचा निकाल वेळेत लागावा यासाठी शिक्षण खात्याने परीक्षा संपलेल्या आठवड्याभरातच पेपर तपासणीचे काम हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे.
त्यानुसार 5 एप्रिल पासून हे काम हाती घेऊन 15 दिवसात पूर्ण केले जाणार आहे. प्रत्येक तपासणी केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेऱ्याची नजर असणारा असून तपासणीचे काम वेळेत पूर्ण व्हावे यासाठी मूल्यमापकांची संख्या वाढवण्यात येणार आहे.
बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यामध्ये कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेच्या 21000 हून अधिक विद्यार्थी -विद्यार्थिनींनी यंदाची बारावीची परीक्षा दिली आहे. या परीक्षेची पेपर तपासणी केंद्रे बेळगाव शहरातील जीएसएस महाविद्यालय, मराठा मंडळ महाविद्यालय, गोगटे महाविद्यालय, एस. एस. मिरजी महाविद्यालय आणि आरएलएस महाविद्यालय या ठिकाणी असणार आहेत.
बेळगाव शहरासह राज्यातील विविध पेपर तपासणी केंद्रावर 5 एप्रिलपासून पेपर तपासणी सुरू होणार असली तरी 3 एप्रिलला केंद्रप्रमुखांना केंद्रात हजर राहण्याची सूचना करण्यात आली आहे. तसेच मूल्यमापकांना 5 एप्रिल पासून केंद्रावर पोहोचावे लागणार असून मेच्या दुसऱ्या आठवड्यात बारावीचा निकाल जाहीर केला जाणार आहे.