कर्नाटक विधानसभा निवडणूक तोंडावर असताना भारतीय जनता पक्षाला भाजप सध्या पक्षांतर्गत असंतोषाच्या जबरदस्त वाढत्या आव्हानाला तोंड द्यावे लागत आहे. विद्यमान आमदार, विधान परिषद सदस्य आणि माजी आमदारांसह भाजपच्या बऱ्याच प्रमुख नेत्यांनी एक तर पक्षाचा राजीनामा दिला आहे किंवा निवडणूक लढवणार नसल्याचे घोषित केले आहे. नाकारण्यात आलेले पक्षाच्या उमेदवारीचे तिकीट हे या असंतोषा मागचे प्रमुख प्राथमिक कारण आहे. ही बंडखोरी फक्त एका पक्षापूर्ती मर्यादित नसून ज्यांना त्यांच्या पक्षाने तिकीट नाकारले आहे त्या सर्वांनी बंडखोरी केली आहे.
राजकीय क्षेत्रामध्ये पदाधिकाऱ्यांची निवड करताना पक्षनिष्ठा या मूलभूत तत्त्वाला प्रथम प्राधान्य दिले जाते. परंतु अशी अनेक उदाहरणे आहेत ज्यामध्ये राजकीय नेत्यांनी आपली मूळ राजकीय संलग्नता सोडून दुसऱ्या राजकीय पक्षात जाणे पसंत केले आहे. याला सर्वसामान्यपणे पक्षांतर करणे किंवा पक्ष बंडखोरी करणे असे म्हटले जाते. मात्र याचा लक्षणीय परिणाम स्वतः तो राजकीय नेता आणि त्याला निवडून आणणाऱ्या मतदारांवर होत असतो.
अलीकडे कांही वर्षांपासून राजकीय नेत्यांनी पक्षांतर केल्याची स्वतःच्या पक्षाचा स्थापित मानदंड आणि विचारधारे विरोधात बंडखोरी केल्याची अनेक ठळक उदाहरणे आहेत. सरकारच्या स्थानिकपासून राष्ट्रीय पातळीवरील कोणत्याही स्तरावर अशा घटना घडतात आणि ज्यामध्ये विविध राजकीय विचारधारेचे राजकारणी गुंतलेले असतात. पक्षांतर अथवा बंडखोरी करण्याची धोरणात्मक स्थितीतील विसंगती, वैयक्तिक श्रद्धा किंवा पक्षाच्या विद्यमान नेतृत्वाबद्दल असंतोष वगैरे अनेक कारणे असू शकतात. राजकीय नेत्यांच्या पक्षांतराचा परिणाम त्यांना निवडून आणणाऱ्या मतदारांवर होत असतो.
सर्वसामान्यपणे मतदार त्यांची एखाद्या पक्षाशी असलेली संलग्नता पक्षाची धोरण आणि मुल्ये याच्या आधारावर उमेदवाराची निवड करतात. हे निवडून आलेले उमेदवार नेते बनून जेंव्हा पक्षांतर करतात तेंव्हा संबंधित मतदाराला उध्वस्त झाल्यासारखे वाटते किंवा तो संभ्रमित होतो.
आपला नेता निवडणुकी दरम्यान दिलेली वचनं आणि पक्षाचे व्यासपीठ सोडून जात असल्याची भावना त्यांच्या मनात निर्माण होऊ शकते. ज्याचे परिवर्तन त्या नेत्यावरील विश्वास आणि आत्मविश्वास गमावण्यामध्ये होऊ शकते. परिणामी मतदार पक्षांतर करणारा नेता आणि संबंधित पक्षाविरुद्ध बंडखोरी करू शकतात मतदारांच्या बंडखोरीचे परिणाम लक्षणीय असतात. त्यामुळे मतदानात घट होण्याबरोबरच ध्रुवीकरण वाढवून राजकीय प्रक्रियेवरील विश्वास उडतो. मतदारांना बंधन मुक्त आणि भ्रमनिरास झाल्यासारखे वाटू लागते आणि लोकशाहीतील मतदारांच्या सहभागाला घसरण लागते.
कांही वेळा बंडखोर मतदार पारंपारिक पक्षाच्या चौकटी बाहेरील पर्याय शोधतात. अशावेळी तिसऱ्या आघाडीचा उमेदवार किंवा स्वतंत्र उमेदवार उदयास येतो. एकंदर मतदारांच्या बंडखोरीचे सकारात्मक परिणाम ही होतात. या बंडखोरीद्वारे एक प्रकारे सत्ताधारी पक्ष आणि नेत्यांना आपल्या मतदार संघाची व्यवस्थित काळजी घ्या आणि प्रचारादरम्यान दिलेल्या वचनांशी बांधिल रहा असा संदेशही मिळतो. या खेरीज ही बंडखोरी मतदारांना त्यांची मूल्य आणि विश्वास जपणारा नव्या दमाचा नेता मिळवून देण्याची संधी उपलब्ध करून देत असते.