बेळगाव लाईव्ह : बेळगावमध्ये जरी विधानसभा निवडणुकीचे वातावरण चुरशीने तयार होत असले तरी सध्या बेळगावच्या राजकारणात महाराष्ट्र एकीकरण समितीचीच हवा आहे. राष्ट्रीय पक्षांच्या उमेदवारांचा श्वास रोखून ठेवणारे प्रचार आणि मराठी भाषिकांचा दिवसागणिक वाढत चाललेला पाठिंबा, न विकता आणि न विकत घेता स्वयंस्फूर्तीने समितीच्या दिशेने वाटचाल करणारा कार्यकर्ता यामुळे समितीची ताकद ‘वाढता वाढता वाढे’ अशी होत चालली आहे.
महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांनी संपूर्ण सीमाभागात एकीची वज्रमूठ आवळून ‘आता नाही तर कधीच नाही’ असा निर्धार करत समस्त मराठी भाषिकांना एकजूट राखण्याचे आणि येत्या निवडणुकीत एकजूट दाखविण्याचे आवाहन केले आहे. गेल्या कित्येक वर्षात निद्रिस्तावस्थेत असलेला मराठी माणूस आता हटकून जागा झाला असून याची प्रचिती सीमाभागात दिवसेंदिवस प्रकर्षाने जाणवत आहे.
आज भांदूर गल्ली येथील सार्वजनिक फलकावर मराठी तरुणांच्या स्वाभिमानाची झलक पाहायला मिळाली असून सार्वजनिक फलकावर चक्क ‘राष्ट्रीय पक्षांना गल्लीमध्ये प्रवेश नाही’ असा इशारा देण्यात आला आहे. दक्षिण मतदार संघाचे रमाकांत कोंडुसकर आणि उत्तर मतदार संघाचे अमर येळ्ळूरकर यांनाच आपला जाहीर पाठिंबा दर्शवत सीमाभागात आलेली समितीची लाट या फलकावरून दर्शविण्यात आली आहे.
महाराष्ट्र एकीकरण समितीच्या विजयासाठी नेत्यांसह आता संपूर्ण सीमाभागातील मराठी भाषिकांनी कम्बर कसली असून आपला स्वाभिमान, आपली अस्मिता आणि आपला बाणा जपण्यासाठी दिवसरात्र प्रत्येक मराठी माणूस झटत आहे.
समितीसाठी अत्यंत पोषक असे वातावरण सीमाभागात तयार झाले असून येत्या निवडणुकीत समितीच्याच विजयाचा गुलाल उधळला जाणार हे निश्चित!