आकाशात तारा तुटणे अर्थात उल्का पडणे सर्वांना सुपरिचित आहे. दरवर्षी 16 ते 26 एप्रिल दरम्यान उल्का वर्षाव होतो. त्यानुसार आज शनिवारी रात्री आणि उद्या रविवारी पहाटे ईशान्य क्षितिजावर स्वरमंडळ तारका समूहातून उल्का वर्षाव होणार आहे. ही घटना खगोलप्रेमींसाठी पर्वणी असणार आहे.
आज शनिवारी होणारा उल्का वर्षाव ‘लीड्स उल्का वर्षाव’ म्हणून देखील ओळखला जातो. या दिवशी पृथ्वी सी1861 थॅचर या धूमकेतूच्या मार्गातून जात असते. हा धूमकेतू दर 415 वर्षांनी सूर्याला भेट देत असतो. दरवर्षी 22 एप्रिलला हा उल्का वर्षाव पाहायला मिळतो. या वर्षावावेळी तासाला 20 ते 30 उल्का प्रति सेकंद 48 कि. मी. इतक्या वेगाने पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करतात. आज शनिवारी रात्री निरभ्र आकाशातील हा उल्का वर्षाव निरीक्षणाची संधी मिळणे ही खगोलप्रेमींसाठी पर्वणी असणार आहे.
पृथ्वीच्या वातावरणात दररोज जवळपास अडीच कोटी उल्का घुसत असाव्यात असा अंदाज आहे. उल्कांचा मोठा जमाव पृथ्वी कक्षेतून जाऊ लागला की उल्कांचा वर्षाव झाल्यासारखे वाटते. पृथ्वीची कक्षा आणि उल्कांची कक्षा निश्चित आहे.
त्यामुळे आकाशातील ठराविक विभागात ठराविक काळात उल्का वर्षाव होतात. ज्या नक्षत्रातून उल्का वर्षा झाल्यासारखे वाटते त्या नक्षत्राला या उल्का वर्षावाचे उगम स्थान म्हंटले जाते.