बेळगाव लाईव्ह : मुस्लिम आरक्षणप्रश्नी सुरु असलेल्या याचिकेची सुनावणी पुढे ढकलण्यात आली असून जोवर न्यायालयातून निकाल जाहीर होत नाही तोवर आरक्षणप्रश्नी कोणताच निर्णय घेतला जाणार नाही, असे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी स्पष्ट केले आहे.
आज धारवाड येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी उपरोक्त प्रतिक्रिया दिली आहे. मुस्लिम आरक्षणाच्या निर्णयाबाबत आम्ही सर्वोच्च न्यायालयात आमची बाजू मांडली आहे. आपण मुस्लिम विरोधी बाजू मांडली नाही. आजपर्यंत मांडलेल्या गोष्टीच आम्ही पुढेदेखील मांडणार आहोत. मुस्लिम आरक्षणप्रश्नी काँग्रेसकडून चुकीची माहिती पुरवली जात असून न्यायालयाने कोणताही स्थगिती आदेश दिला नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
मुस्लिम समाजात सुमारे १७ पोटजाती आहेत. शिवाय या सर्व पोटजाती मागासवर्गीय आहेत. या पोटजातींसाठी अल्प उत्पन्नासाठी आरक्षण असून आम्ही जी बाजू मांडली आहे त्यातूनदेखील असेच आरक्षण दिले जाईल, या समाजावर अन्याय होणार नाही, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.