बेळगाव लाईव्ह : बेळगावसह संपूर्ण सीमाभागात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर समितीमय वातावरण निर्माण झाले आहे. कार्यकर्त्यांचा वाढता ओढा आणि ठिकठिकाणी उमेदवारांच्या प्रचारार्थ निघणाऱ्या प्रचार फेऱ्या, जाहीर सभा यामध्ये कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त सहभाग अंगावर शहारे उभं करणारा ठरत आहे.
दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे म. ए. समितीचे अधिकृत उमेदवार रमाकांत कोंडुसकर यांच्यामागे दिवसेंदिवस संघ-संस्था, कार्यकर्ते, महिला संघटना यांच्यासह अबाल-वृद्धांचा पाठिंबा वाढत चालला असून निकालापूर्वीच गुलालाने माखलेली प्रचार फेरी दररोज दक्षिण विधानसभा मतदार संघात निघत आहे.
सुमारे २३५००० इतकी मतदार संख्या असलेल्या दक्षिण विधानसभा मतदार संघात भाजप, काँग्रेस, म. ए. समिती आणि अनेक स्थानिक पक्ष, अपक्ष उमेदवारांनी जरी अर्ज दाखल केले असले तरी या मतदार संघात खरी लढत हि समिती विरुद्ध भाजप अशीच होणार आहे.
म. ए. समितीचे अधिकृत उमेदवार रमाकांत कोंडुसकर यांच्या प्रचारफेरीत दाखल होणारे कार्यकर्ते हि रमाकांत कोंडुसकर यांच्यावर प्रचंड विश्वास दर्शवत आहेत. बेळगावच्या विकासासाठी, मातृभाषेच्या संरक्षणासाठी आणि विचारांचे राजकरण करण्यासाठी दक्षिण मतदार संघच नव्हे तर संपूर्ण सीमाभागातील मराठी भाषिक रमाकांत कोंडुसकर यांना पाठिंबा दर्शवत आहेत.
प्रचार फेरीत दाखल होणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हातातील फलक हे अधिक लक्षवेधी ठरत आहेत. घोषणाबाजीने परिसर दणाणत आहे. मात्र फलकांवर लिहिलेला मजकूर मनाचा ठाव घेत आहे. गेल्या पाच वर्षात झोपी गेलेल्या मतदाराला अंतर्मुख करायला लावणारे फलक दक्षिण मतदार संघासह बेळगावकरांच्या मनावर देखील उमटत आहेत.
वॉट्सअप, फेसबुक या माध्यमातून अनेकांच्या स्टेटस वर हे फलक अपलोड केले जात आहेत. एकंदरीत रमाकांत कोंडुसकर यांच्या प्रचाराचा धुराळा उडत असून चोहोबाजूंनी त्यांच्या विजयाची दवंडी दिली जात असल्याचेही पाहायला मिळत आहे.