महाराष्ट्र एकीकरण समितीच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचाराला आता सुरुवात झाली असून सुरुवातीच्या टप्प्यातच बेळगाव ग्रामीण, दक्षिण, उत्तर आणि खानापूरच्या उमेदवारांनी प्रचारात आघाडी घेतल्याचे चित्र प्रथम दर्शनी पाहायला मिळत आहे.
एकीकडे भाजप, काँग्रेस आदी राष्ट्रीय पक्षांचे स्टार प्रचारक निवडणूक रणधुमाळीत उडी घेण्याच्या तयारीत असताना दुसरीकडे महाराष्ट्र एकीकरण समितीचे स्टार प्रचारक तोडीस तोड उत्तर देण्यासाठी सज्ज झाले आहेत पहिल्या टप्प्यात येत्या शनिवारी आणि रविवारी दोन दिवस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्रातील जामखेडचे आमदार रोहितदादा पवार बेळगाव दक्षिण उत्तर ग्रामीण आणि खानापूर मतदार संघात समिती उमेदवारांचा प्रचार करणार आहेत याखेरीज संजय राऊत आणि सुषमा अंधारे यांना देखील प्रचारासाठी आणण्याचा प्रयत्न सुरू आहे.
दरम्यान, मध्यवर्तीय महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष मनोहर किणेकर यांच्या नेतृत्वाखालील समितीच्या शिष्टमंडळाने काल मुंबई येथे सीमा समन्वयक मंत्री शंभूराज देसाई यांची भेट घेतली. यावेळी कर्नाटकात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीबाबत मंत्री देसाई यांना माहिती देण्यात आली. मराठी बहुल भागात समितीने उमेदवार दिले असून सर्व ठिकाणी समितीला पोषक वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे समितीच्या प्रचारासाठी महाराष्ट्रातील नेत्यांनी यावे अशी विनंती यावेळी करण्यात आली.
तेंव्हा मंत्री शंभूराज देसाई यांनी समिती उमेदवारांच्या प्रचारासाठी निश्चितपणे येऊ असे सांगून त्यासंदर्भात प्रथम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करून तारीख निश्चित केली जाईल असे आश्वासन दिले आहे. त्याचप्रमाणे समितीच्या शिष्टमंडळाने राष्ट्रवादीचे अध्यक्ष माजी मंत्री जयंत पाटील यांची भेट घेऊन त्यांनाही प्रचारासाठी येण्याची विनंती केली.
त्यावेळी माजी मंत्री पाटील यांनी देखील प्रचारासाठी येण्याचे आश्वासन दिले आहे. एकूणच महाराष्ट्रातील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसची नेतेमंडळी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या प्रचार सभांमध्ये स्टार प्रचारक म्हणून काम करणार आहेत.