Monday, November 25, 2024

/

लक्षवेधी पारंपरिक पेहराव आणि अनवाणी पायाने विजयाचा रथ ओढणारे : रमाकांत कोंडुसकर

 belgaum

बेळगाव लाईव्ह : एखादा राजकारणी किंवा नेता म्हटलं कि आपल्यासमोर सर्वसामान्यपणे शुभ्र पांढऱ्या कपड्यातील व्यक्तिमत्व डोळ्यासमोर उभं राहतं. परंतु बेळगाव दक्षिणमध्ये पसरलेले रमाकांत कोंडुसकर नावाचे वादळ हे इतर राजकारण्यांपेक्षा नक्कीच वेगळे आहे, याची प्रचिती आज बेळगावकरांना आली.

महाराष्ट्र एकीकरण समितीचे अधिकृत उमेदवार म्हणून अर्ज दाखल करण्यासाठी आज महाराष्ट्र एकीकरण समितीने तमाम सीमावासीयांना आवाहन केले होते. विविध गोष्टींचे आमिष दाखवून गर्दी जमवून शक्ती प्रदर्शन करणाऱ्या राष्ट्रीय पक्षांना आज समिती नेत्यांनी चोख प्रत्त्युत्तर दिले आहे. केवळ आणि केवळ आपल्या मराठी अस्मितेसाठी आणि स्वाभिमानासाठी प्रखर उन्हाच्या झळांची तमा न बाळगता जमलेली गर्दी आणि या गर्दीत कार्यकर्त्यात मिसळून वावरणारे नेते म्हणजे रमाकांत कोंडुसकर.

उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आज रमाकांत कोंडुसकर यांनी पारंपरिक पेहरावात हजेरी लावली. स्वतः बैलगाडी हाकत शुभ्र धोतर, सदरा आणि डोक्यावर भगवा फेटा परिधान करून आलेल्या रमाकांत कोंडुसकर यांच्या पेहरावामुळे आज अनेकांचे लक्ष वेधले गेले. अनवाणी पायांनी बैलगाडी हाकणारे रमाकांत कोंडुसकर ज्यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानातून बाहेर आले त्यावेळी समर्थक, कार्यकर्ते आणि मराठी भाषिकांचा प्रचंड उत्साह पाहून काही क्षण भावुक झाले. चेहऱ्यावर समाधानाचे हास्य आणि मनात कार्यकर्त्यांविषयी आपुलकी ठेवून वाटचाल करणारा हा नेता सर्वसामान्यांच्या मनाला भिडणारा आहे. इतक्या प्रचंड गर्दीत देखील आपली मराठी रांगडी भाषा बाजूला न ठेवता ‘आपण जसे आहोत, तसेच इतरांच्या समोर व्यक्त व्हावे’! अशा पद्धतीने ते संपूर्ण मिरवणुकीत वावरले.Craze ramakant

केवळ राजकारण म्हणून नव्हे तर लाखो सीमावासीय मराठी भाषिकांची होत असलेली कुचंबणा आणि सीमावासीयांची होत असलेली घुसमट पाहून आपण विजयाच्या दिशेनेच घोडदौड करत आहोत असा ठाम विश्वास त्यांच्या नजरेत दिसून आला. आणि अशाच पद्धतीने स्वतःच्या विजयाचा रथ स्वतःच हाती घेऊन आपल्या हजारो समर्थकांसह त्यांनी संपूर्ण मिरवणुकीत बैलजोडी हाकली. शेतकरी कुटुंबाचीच पार्श्वभूमी असलेल्या रमाकांत कोंडुसकरांच्या चेहऱ्यावर असलेले सदोदित हास्य यामुळे राजकारणी असूनही आपल्यातीलच व्यक्तिमत्व असल्याची जाणीव झाल्याने अनेक तरुणांनी रमाकांत कोंडुसकर यांना स्वतः व्यक्तिगत येऊन शुभेच्छा दिल्या.

आणि तितक्याच प्रेमाने रमाकांत कोंडुसकरांनी कार्यकर्त्यांच्या पाठीवर हात फिरवला. आजवर दक्षिण विधानसभा मतदार संघात जनतेने दडपशाही अनुभवली आहे. मात्र जनतेसमोर रमाकांत कोंडुसकर यांच्यासारखे सर्वसामान्य नागरिकांचेच प्रतिनिधित्व करणारे नेतृत्व उभे राहिल्याने दक्षिण विधानसभा मतदार संघात सकारात्मक परिवर्तन होईल, हे निश्चित!

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.