बेळगाव लाईव्ह : बेळगाव उत्तर मतदार संघातील लिंगायत समाजाच्या मतदारांची संख्या पाहता उत्तर मतदार संघातून तसेच दक्षिण विधानसभा मतदार संघातून लिंगायत समाजाच्या उमेदवाराची निवड राष्ट्रीय पक्षांनी करावी, या मागणीसाठी आज बेळगावमधील नागनूर मठात लिंगायत संघटनांची महत्वपूर्ण बैठक आयोजिण्यात आली होती.
आगामी विधानसभा निवडणुकीत बेळगाव उत्तर मतदार संघातून लिंगायत समाजातील उमेदवाराला प्राधान्य देण्यात यावे, राष्ट्रीय पक्षांनी येथील उमेदवारांची संख्या पाहता लिंगायत समाजालाच उमेदवारी द्यावी, अन्यथा सर्व राष्ट्रीय पक्षांना योग्य धडा शिकविण्यात येईल, असा इशाराही या बैठकीत देण्यात आला.
राष्ट्रीय बसवदल, राष्ट्रीय बसवसेना, लिंगायत संघटना, अ. भा. वीरशैव महासभा, जागतिक लिंगायत महासभा, लिंगायत क्षेमाभिवृद्धी संघ, लिंगायत सेवा समिती आदी संघटनांनी एकवटून आज या बैठकीचे आयोजन केले होते. लिंगायत समाजाला उत्तर आणि दक्षिण मतदार संघात कोणत्याही राष्ट्रीय पक्षांनी लिंगायत समाजाच्या उमेदवाराला संधी दिलेली नाही. महापौर – उपमहापौर, बुडा अध्यक्ष या पदासाठीही लिंगायत समाजाला डावलण्यात आले आहे. लिंगायत समाजावर हा मोठा अन्याय होत असून आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय पक्षांनी लिंगायत समाजाला प्राधान्य न दिल्यास संपूर्ण लिंगायत समाज एकवटून कठोर निर्णय घेईल, असा इशारा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला.
विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रीय पक्षांनी लिंगायत समाजाच्या उमेदवाराला प्राधान्य द्यावे, अशी मागणी सर्व समाजाच्यावतीने करण्यात आली आहे.
जो राष्ट्रीय पक्ष लिंगायत समाजाला उमेदवारी देईल त्या पक्षाला संपूर्ण लिंगायत समाज आणि सर्व संघटनांचा पाठिंबा असेल, असेही यावेळी जाहीर करण्यात आले.