गेली ६६ वर्षे कर्नाटकात खितपत पडलेले सीमावासीय महाराष्ट्राकडे आशेच्या नजरेने पहात आले आहेत. कर्नाटकात होणाऱ्या अन्यायातून – अत्याचारातून महाराष्ट्र नक्कीच आपल्याला सोडवेल, अशी आशा ठेवून सीमावासियांच्या पाठीशी नव्हे तर सीमावासियांच्या बाजूने महाराष्ट्र खंबीर उभं राहील अशी भाबडी आशा ठेवलेल्या सीमावासियांच्या महाराष्ट्र नेहमीच भ्रमनिरास करत आला आहे. याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला आहे.
महाराष्ट्र भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी सीमाभागात प्रचार कार्यक्रमात हजेरी लावली असून पुन्हा मराठी भाषिकांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार करण्यात आल्याने सीमावासीयातून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
कर्नाटक विधानसभेत सीमाभागातील अन्यायाविरोधात आवाज उठविण्यासाठी आणि सीमावासियांच्या बाजू मांडण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समिती गेली अनेक वर्षे निवडणूक लढवत आहे. या निवडणुकीच्या काळात महाराष्ट्रातील राष्ट्रीय पक्षांच्या नेत्यांनी प्रचारासाठी येऊ नये अशी सातत्याने मागणी केली जाते. लढे होतात, आंदोलने होतात, चळवळी उभ्या केल्या जातात. यावेळी महाराष्ट्राकडून आश्वासनांची खैरात केली जाते. सीमावासियांच्या प्रत्येक मागणीला होकार दर्शवत सकारात्मक प्रतिसाद दिला जातो.
मात्र ऐनवेळी महाराष्ट्रातील राष्ट्रीय पक्षांचे नेते हजर होतात आणि समस्त सीमावासियांच्या हिरमोड होतो. फेब्रुवारी महिन्यात मुंबई येथे झालेल्या सीमावासियांच्या आंदोलनादरम्यान समिती शिष्टमंडळाने महाराष्ट्र सरकारकडे विनंती केली होती, कि आगामी विधानसभा निवडणुकीत प्रचारासाठी कोणत्याही राष्ट्रीय पक्षाने बेळगावमध्ये हजेरी लावू नये. सीमा लढा आणि सीमाभाग याबाबत कर्नाटकाच्या दुटप्पी धोरणाची इत्यंभूत माहिती असूनही महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवाराविरोधात पुन्हा महाराष्ट्र भाजपने प्रचारात हजेरी लावली असून याबाबत सीमावासीयातून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
महाराष्ट्र एकीकरण समितीमध्ये एकी घडावी अशी सातत्याने सूचना करणाऱ्या महाराष्ट्राने आता सीमाभागात एकी होऊन समिती नेत्यांसह मराठी भाषिक एकवटला असताना अशापद्धतीने प्रचारात दाखल होणे हे कितपत योग्य आहे? नक्की महाराष्ट्र सीमावासियांच्या बाजूने आहे कि सीमावासियांच्या बाजूने असल्याचा कांगावा केला जातो? असे परखड सवालही उपस्थित करण्यात येत आहेत.