बेळगाव लाईव्ह : दक्षिण विधानसभा मतदार संघात महाराष्ट्र एकीकरण समितीच्या झेंड्याखाली अधिकृत उमेदवार म्हणून निवडणूक आखाड्यात उतरलेले रमाकांत कोंडुसकर यांना दिवसेंदिवस कार्यकर्त्यांचा मोठा पाठिंबा लाभात आहे.
दिवसरात्र मराठी भाषिकांच्या दारोदारी प्रचारासाठी जाणाऱ्या रमाकांत कोंडुसकर यांच्या प्रचारफेरीत ‘बघताय काय सामील व्हा…”! याप्रमाणे हजारोंच्या संख्येने कार्यकर्त्यांचा सहभाग दिसून येत आहे.
महाराष्ट्र एकीकरण समितीमधील एकजूट आता जनतेमध्येही दिसून येत असून भविष्यात प्रशासकीय वरवंटा दूर सारण्यासाठी आपला पाठीराखा निवडण्याचे व्रत मराठी भाषिकांनी घेतले आहे. स्मार्ट सिटीच्या नावाखाली झालेला भ्रष्टाचार, दक्षिण विधानसभा मतदार संघात सुरु असलेली दडपशाही याला आता जनताच कंटाळली असून आपले मत समितीच्याच पाठीशी असल्याचे चित्र रमाकांत कोंडुस्कर यांच्या प्रचार फेरीत दिसून येत आहे.
निवडणुकीच्या तोंडावर मराठी भाषिक मतदारांना भुरळ घालणाऱ्या राष्ट्रीय पक्षांचे डावपेच ओळखून मतदार वेळीच जागृत झाले असून महाराष्ट्र एकीकरण समितीला संपूर्ण पाठिंबा असल्याचे मतदार जाहीर करत आहेत. दक्षिण विधानसभा मतदार संघातील यरमाळ , अवचारहट्टी, देवगणहट्टी, मास्केनहट्टी, ब्रम्हलिगहट्टी, धामणे आदी गावातून शुक्रवारी प्रचारफेरी झाली. पहिल्यांदाच हट्टी परिसरात समिती उमेदवाराला इतक्या मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळाला.
दक्षिण मतदार संघातील प्रचार फेऱ्याना गेल्या ८ दिवसात रेकॉर्ड ब्रेक गर्दी प्रचार फेरीत पाहायला मिळत आहे. दक्षिण विधानसभा मतदार संघात सर्वत्र समितीमय वातावरण निर्माण झाले असून नेत्यांसह आता जनतेमध्येही एकजूट दिसून येत आहे. या एकजुटीचे परिणाम येत्या निवडणुकीत आणि निकालात नक्कीच दिसून येतील, अशी आशा प्रत्येक मराठी भाषिकांच्या मनात निर्माण झाली आहे.
दरम्यान शुक्रवारी येळळूर विभाग महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले.यावेळी समिती नेते मंडळीनी जोमाने कामाला लागण्याचे ठरवले.