बेळगाव दक्षिण मतदार संघातील महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार रमाकांत कोंडुसकर यांनी आज सकाळी शहरातील विविध उद्यानं आणि मैदानांना भेट देऊन मॉर्निंग वॉकर्ससह ज्येष्ठ नागरिक, महिला आणि क्रीडापटूंच्या गाठीभेटी घेतल्या. यावेळी त्या सर्वांनी कोंडुसकर यांना उस्फूर्तपणे आपला संपूर्ण पाठिंबा व्यक्त केला.
विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात झाली असून त्या अनुषंगाने बेळगाव दक्षिण मधील महाराष्ट्र एकीकरण समितीचे अधिकृत उमेदवार रमाकांत कोंडुसकर यांनी आपल्या समर्थकांसमवेत आज मंगळवारी सकाळी शहापूर छ. शिवाजी उद्यान, टिळकवाडीतील बॅ. नाथ पै उद्यान, सायन्स उद्यान, व्हॅक्सिन डेपो मैदान वगैरे उद्यान आणि मैदानांचा दौरा केला.
कोंडुसकर यांनी छ. शिवाजी उद्यान येथे सकाळी फिरावयास येणाऱ्या मॉर्निंग वॉकर्स ग्रुप आणि मॉर्निंग वॉकर्सच्या गाठीभेटी घेण्याबरोबरच उद्यानातील व्यायामाची साधने असलेल्या ठिकाणी जाऊन युवा मतदारांच्या ही भेटी घेतल्या. यावेळी सर्वांनी त्यांना पाठिंबा दर्शविला रमाकांत कोंडुसकर उद्यानात दिसताच बहुतांश मॉर्निंग वॉकर्सनी स्वतःहून त्यांची भेट घेत पाठिंबा व्यक्त केला.
उद्यानामध्ये एका ज्येष्ठ नागरिकाने आपली समस्या आणि होत असलेला त्रास कोंडुसकर यांच्यासमोर विषद केला. त्यावेळी अजून 16 दिवस थांबा 17 वा दिवस आपला आहे. त्यानंतर कोणालाही त्रास होणार नाही आश्वासन देऊन आपण सर्व नग्न जन्माला आलो आणि नग्नच स्वर्गवासी होणार आहोत. जाताना कोणी काही घेऊन जाणार नाही. तेंव्हा कोणालाही घाबरण्याचे कारण नाही असा दिलासा रमाकांत कोंडुसकर यांनी त्यांना दिला.
उद्यानाना दिलेल्या भेटीप्रसंगी ज्येष्ठ कामगार नेते माजी महापौर ॲड. नागेश सातेरी यांना पाहताच कोंडुसकर यांनी त्यांच्याकडे जाऊन पाया पडून त्यांचे आशीर्वाद घेतले. तेंव्हा ॲड. सातेरी यांच्यासह त्यांच्या सर्व मॉर्निंग वॉकर्स सहकार्यांनी आपला पाठिंबा व्यक्त करत तुम्हाला विजयाची संधी असल्याचे कोंडुसकर यांना सांगितले. त्यानंतर रमाकांत कोंडुसकर यांनी उद्यानात फिरण्याचा व्यायाम करण्यास आलेल्या ज्येष्ठ महिलावर्गाची भेट घेतली. आपले चरण स्पर्श करणाऱ्या कोंडुसकर यांना त्या वयस्कर महिलांनी यशस्वी व्हा असा आशीर्वाद दिला.
टिळकवाडीतील नाथ पै उद्यानाला भेट दिल्यानंतर कोंडुसकर यांनी व्हॅक्सिन डेपो मैदान, सुभाषचंद्र बोस (लेले) मैदान या मैदानांना भेटी दिल्या. यावेळी त्यांनी मैदानावर क्रिकेट व अन्य खेळ खेळणाऱ्या युवा मतदारांशी संवाद साधून निवडणुकीतील विजयासाठी सहकार्य करण्याची विनंती केली. आजच्या उद्यानं आणि मैदानांच्या दौऱ्याप्रसंगी सर्व ठिकाणी प्रत्येक जण उत्स्फूर्तपणे कोंडुसकर यांना संपूर्ण पाठिंबा व्यक्त करताना दिसत होता.