विधानसभा निवडणुकीच्या कामासाठी नेमलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना निर्धारित शासकीय वेतनासह रोजच्या कामासाठी स्वतंत्र निवडणूक भत्ता दिला जातो. या भत्त्यात वाढ करण्याचा आदेश राज्य शासनाने बजावला आहे.
राज्य शासनाने निवडणुकीसाठी नियुक्त पोलिसांचा भत्ता वाढविला असून जिल्हा पोलीस अधीक्षक तसेच त्यावरील अधिकाऱ्यांच्या निवडणूक भत्त्यात 2 हजार रुपये वाढ करण्यात आली आहे. यापूर्वी त्यांना 5 हजार रुपये इतका मिळणारा भत्ता आता 7000 रुपये होणार आहे. पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांना पूर्वी निवडणुकांसाठी रोज 500 रु. भत्ता दिला जात होता तो 700 रुपये केला आहे.
पोलीस उपनिरीक्षक, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, हेड कॉन्स्टेबल आणि कॉन्स्टेबल यांना पूर्वी 350 रु. भत्ता दिला जात होता तो वाढवून 500 रुपये करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे फॉरेस्ट गार्ड आणि इतर कर्मचाऱ्यांना 150 रु. असलेला भत्ता 250 रुपये इतका वाढविण्यात आला आहे.
याबरोबरच निवडणूक कार्यासाठी नियुक्त इतर अधिकाऱ्यांच्या भत्त्यात देखील वाढ करण्यात आली आहे. निवडणूक प्रोसिडिंग अधिकाऱ्यांना रोज 2000 रुपये भत्ता दिला जाणार असून एआरपीओंना 1400 रु. पोलिंग अधिकाऱ्यांना 1050 रु.,शमायक्रो ऑब्झर्व्हर्सना 1500 रु. तसेच मतदानादिवशी नियुक्त केल्या जाणाऱ्या बूथ पातळीवरील अधिकाऱ्यांना (बीएलओ) 350 रुपये, तर ग्रुप डी दर्जाच्या कर्मचाऱ्यांना 200 रुपये भत्ता दिला जाणार आहे.