Wednesday, December 25, 2024

/

चन्नम्मा सर्कल ‘प्रोटेस्ट फ्री झोन’ करा; जायंट्स मेनची मागणी

 belgaum

सततच्या आंदोलनामुळे वाहतूक कोंडीचा जनतेला होणारा मनस्ताप लक्षात घेऊन शहरातील कित्तूर राणी चन्नम्मा सर्कल परिसर ‘प्रोटेस्ट फ्री झोन’ अर्थात आंदोलन -निदर्शन मुक्त प्रदेश म्हणून घोषित करावा, अशी मागणी जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव मेनच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.

जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव मेनच्या पदाधिकारी आणि सदस्यांनी आज सोमवारी सकाळी अध्यक्ष सुनील मुतगेकर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन उपरोक्त मागणीचे निवेदन त्यांना सादर केले. जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी निवेदनाचा स्वीकार करून लवकरात लवकर योग्य ती कार्यवाही करण्याचे ठोस आश्वासन दिले.

जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव मेन ही एक सामाजिक संघटना असून गेल्या 35 वर्षापासून ती बेळगाव शहरात जनहितार्थ कार्यरत आहे. वस्तुस्थिती सांगायची म्हणजे या ना त्या राजकीय पक्षांतर्फे शहरातील कित्तूर राणी चन्नम्मा सर्कल येथे सातत्याने आंदोलन केली जातात. असा एकही आठवडा गेलेला नाही की या चौकात आंदोलन झालेले नाही. परिणामी आंदोलनाप्रसंगी पोलिसांकडून राणी चन्नम्मा सर्कल येथील वाहतूक अडवली जाते.Dc bgm

सकाळच्या घाई गडबडीच्या वेळी वाहतूक दोन-तीन तासासाठी अडवली गेल्यामुळे ऑफिसला अथवा न्यायालयातील सुनावणीला उपस्थित राहण्यासाठी घाईत असलेल्या, त्याचप्रमाणे अन्य कांही तातडीच्या कामासाठी जाऊ इच्छिणाऱ्या लोकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो. हॉस्पिटलमध्ये हलविण्यात येत असलेल्या रुग्णांची हेळसांड होते. एकंदर आंदोलनांसाठी वाहतूक रोखण्यात आल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. तेंव्हा या सर्व गोष्टींची गांभीर्याने दखल घेऊन कित्तूर राणी चन्नम्मा सर्कल या चौकाचा परिसर प्रोटेस्ट फ्री झोन अर्थात आंदोलन -निदर्शन मुक्त प्रदेश म्हणून घोषित करावा. ज्यामुळे सर्वसामान्य जनतेला आपल्या महत्त्वाच्या कामांना हजेरी लावण्याच्या बाबतीत दिलासा मिळेल, अशा आशयाचा तपशील जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आलेल्या निवेदनात नमूद आहे.

निवेदन सादर करतेवेळी जायंट्सचे मदन बामणे यांनी जिल्हाधिकारी नितेश पाटील यांना चन्नम्मा सर्कल येथील आंदोलन निदर्शनांमुळे सर्वसामान्यांना होणाऱ्या त्रासाची माहिती दिली. याप्रसंगी जायंट्स उपाध्यक्ष अविनाश पाटील, अरुण काळे, सचिव लक्ष्मण शिंदे, मोहन कारेकर, विजय बनसुर, शिवकुमार हिरेमठ, अजित कोकणे, सुनील चौगुले, राहुल बेलवलकर, विश्वास पवार, अनिल चौगुले, मधु बेळगावकर, गावडू पाटील, राजू जैन, महेश रेडेकर, आनंद कुलकर्णी, दिगंबर किल्लेकर आदी जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव मेनचे बहुसंख्य सदस्य उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.