पोहण्यासाठी गेलेल्या सहा युवकांपैकी 4 जणांचा नदीपात्रात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना काल शुक्रवारी दुपारी धुपदाळ (ता. गोकाक) येथे घडली असून मृत्यू पावलेले सर्व युवक कारवार जिल्ह्यातील मुंदगोड तालुक्यातील आहेत.
संतोष बाबू इडगे (वय 19), अजय बाबू जोरे (वय 19), कृष्णा बाबू जोरे (वय 19) व आनंद विटू कोकरे (वय 20, चौघेही रा. शिरगेरी, ता. मुंदगड, जि. कारवार) अशी मृत्युमुखी पडलेल्या दुर्दैवी युवकांची नावे आहेत. सदर दुर्घटनेतून विठ्ठल जाणू कोकरे आणि रामचंद्र कोकरे हे दोन युवक बचावले आहेत. घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस प्रमुख डॉ. संजीव पाटील यांनी धुपदाळला धाव घेत घटनास्थळाची पाहणी करून आवश्यक सूचना केल्या.
मिळालेल्या माहितीनुसार उपरोक्त सर्व युवक घटप्रभामधील एका बारमध्ये काम कामाला होते. काल शुक्रवारी डॉ. आंबेडकर जयंती निमित्त बार बंद असल्यामुळे पोहण्याचा आनंद लुटण्यासाठी हे सर्वजण धुपदाळ सरकारी विश्राम धामा जवळील घटप्रभा नदीत पोहण्यासाठी गेले होते.
नदीपात्रात बुडालेल्या बहुतेकांना पोहता येत होते. मात्र पाण्याखाली असलेल्या चिखलाच्या गाळात पाय रुतल्याने ही दुर्घटना घडल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले. सदर घटनेची घटप्रभा पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे.