बेळगाव शहरासभोवतीच्या रिंग रोडसाठी केल्या जाणाऱ्या भू-संपादनाच्या विरोधात सुमारे 865 शेतकऱ्यांनी आपले लेखी आक्षेप नोंदविले आहेत. यासंदर्भात आज झालेल्या सुनावणी प्रसंगी उचगाव येथील शेतकऱ्यांनी आपल्या वैयक्तिक आक्षेपांवर म्हणणे मांडून आमची सुपीक जमीन आम्ही कोणत्याही परिस्थितीत देणार नाही, असे ठणकावून सांगितले.
तालुक्यातील सुमारे 1272 एकर सुपीक जमीन बेळगावच्या सभोवताली रिंगरोड करण्यासाठी भू-संपादन करण्याचा डाव राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने आखला आहे.
सदर भूसंपादनाच्या विरोधात सुमारे 865 शेतकऱ्यांनी आपले लेखी आक्षेप नोंदविले आहेत. या संदर्भात आज सोमवारी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणामार्फत उचगांव येथील शेतकऱ्यांना सुनावणीसाठी नोटीस बजावण्यात आली होती.
त्यानुसार सर्व शेतकऱ्यांनी सदर कार्यालयात उपस्थित राहून आपल्या वैयक्तिक आक्षेपावर आपापले म्हणणे मांडून आमची जमीन कोणत्याही परिस्थितीत देणार नाही असे ठणकावून सांगितले. भूसंपादन अधिकारी अनुराधा वस्त्रद यांच्यासमोर ही सुनावणी झाली .
यावेळी म. ए. समितीचे युवा नेते ॲड. सुधीर चव्हाण, ॲड. एम. जी. पाटील, ॲड. प्रसाद सडेकर, बी. एस. होनगेकर, लक्ष्मण होनगेकर, मनोहर होनगेकर याच्यांसह शेतकरीवर्ग बहुसंख्येने उपस्थित होता.