कर्नाटक राज्य सरकारने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गेल्या 27 फेब्रुवारी रोजीच्या सुनिश्चित शिमोगा आणि बेळगावसह एकंदर कर्नाटक दौऱ्याचा खर्च 36.43 कोटी रुपये इतका दाखविला आहे. यामध्ये पंतप्रधानांच्या बेळगाव येथील कार्यक्रमावर सरकारने तब्बल 15.37 कोटी रुपयांचा लक्षणीय खर्च केला आहे.
कर्नाटक सरकारच्या गेल्या 24 मार्च रोजीच्या राजपत्रानुसार राज्य सरकारने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याप्रसंगी 30 कि. मी. लांब बॅरिकेड्स आणि देखावे -प्रतिमा यांच्यावर 1.98 कोटी रुपये खर्च केले आहेत. याबरोबरच बेळगावातील पंतप्रधान किसान योजनेचा 13 वा हप्ता वितरण कार्यक्रमाप्रसंगी आयोजित जाहीर सभेवर 13.39 कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे.
यामध्ये 4.55 कोटी रुपये व्यासपीठ उभारणीसाठी, लाभार्थींच्या वाहतुकीसाठी 4.46 कोटी आणि अन्य विविध कारणास्तव केल्या गेलेल्या 4.37 कोटी रुपये खर्चाचा समावेश आहे.
लक्षात घेण्याजोगी बाब म्हणजे या सर्व कामांसाठी राज्य सरकारने सार्वजनिक बांधकाम खात्याला मंजुरी दिली असून कर्नाटकच्या पारदर्शकतेसाठी असलेल्या सार्वजनीक खरेदी कायदा 1999 मध्ये त्यांना सूटही देण्यात आली आहे.