विनापरवानगी शाळा सुरू केल्याच्या अनेक तक्रारी दाखल झाल्यामुळे त्याची गांभीर्याने दखल घेत ज्या ठिकाणी अशा शाळा सुरू आहेत त्या शाळांची यादी जाहीर करण्याचा निर्णय शिक्षण खात्याने घेतला होता. त्यानुसार माहिती संकलित केली असता बेळगाव जिल्ह्यातील 7 शाळांसह राज्यात एकूण 1600 अनधिकृत शाळा असल्याचे शिक्षण खात्याच्या निदर्शनास आले आहे.
कोणत्याही माध्यमाची शाळा सुरू करण्यासाठी शिक्षण खात्याकडून रीतसर अधिकृत परवानगी घ्यावी लागते. परवानगीसाठी अर्ज करताना शाळा सुरू करण्यासाठी आवश्यक इमारत, मूलभूत सुविधा, मैदान यासह इतर प्रकारची आवश्यक ती माहिती द्यावी लागते.
या माहितीसह शिक्षण खात्याकडे अर्ज केल्यावर शिक्षणाधिकारी सर्व गोष्टींची शहानिशा करून शाळेला परवानगी द्यावी की नाही? याबाबत निर्णय घेतात. तथापि कांही मंडळी शिक्षण खात्याकडून परवानगी न घेताच एल केजी, युकेजीचे वर्ग आणि नर्सरी शाळा सुरू करत आहेत.
सदर ठिकाणी विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारची सुविधा न देता दोन वर्ष शाळा सुरू ठेवून नंतर ती बंद केली जाते. याचा सर्वाधिक फटका शहरी भागातील विद्यार्थ्यांना बसत असल्यामुळे अशा शाळांच्या विरोधातील तक्रारी वाढल्या होत्या. परिणामी शिक्षण खात्याने अनाधिकृत सुरू असलेल्या शाळांची माहिती संकलित करण्याचा निर्णय घेतला होता.
त्यानुसार माहिती संकलित केली असता राज्यात एकूण 1600 अनधिकृत शाळा असल्याचे स्पष्ट झाले आहे. यामध्ये बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यातील 7 शाळांचा समावेश आहे. आता परवानगी न घेता सुरू केलेल्या शाळांची यादी जाहीर करून त्या शाळांवर कारवाई करण्याचा निर्णय शिक्षण खात्याने घेतला आहे.