बेळगाव शहरातील सदाशिवनगर शेवटचा क्रॉस येथील दुर्लक्षित नाल्याच्या बाबतीत महापालिकेला केंव्हा जाग येणार? असा संतप्त सवाल केला जात असून या नाल्याकडे गांभीर्याने लक्ष देऊन महापालिकेने पावसाळ्यापूर्वी त्याची साफसफाई करावी, अशी जोरदार मागणी केली जात आहे.
सदाशिवनगर शेवटचा क्रॉस येथील नाल्याचे चांगले बांधकाम करावे अथवा किमान वर्षातून एकदा या नाल्याची साफसफाई केली जावी अशी गेल्या 15 वर्षांपासून या परिसरातील नागरिकांची मागणी आहे. तथापि आजतागायत लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाकडून लोकांच्या या मागणीला वाटाण्याच्या अक्षता लावण्यात आल्या आहेत.
परिणामी गाळ आणि केरकचऱ्यामुळे हा नाला तुंबला असून नाल्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात झाडे-झुडपे वाढली आहेत. नाल्यातील तुंबलेल्या घाणीमुळे परिसरात दुर्गंधीचे वातावरण पसरलेले असते. सदाशिवनगर, नेहरूनगर व अझमनगर भागातील गटारी या नाल्याला जोडले आहेत. त्यामुळे तेथील सर्व सांडपाणी मोठ्या प्रमाणात नाल्यात मिसळत असते. वेळच्यावेळी स्वच्छता केली जात नसल्यामुळे पावसाळ्यात या नाल्याच्या परिसरात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होऊन आसपासच्या घरांमध्ये सांडपाणी शिरते.
सदर नाल्याचे स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत व्यवस्थित बांधकाम केले जावे किंवा किमान वेळच्यावेळी नाल्याची स्वच्छता केली जावी अशी मागणी स्थानिक नागरिक सातत्याने करत असतात. अलीकडेच गेल्या फेब्रुवारी महिन्यात सामाजिक कार्यकर्ते प्रसाद चौगुले यांनी सदर नाल्या संदर्भात उपमहापौर रेश्मा पाटील यांना निवेदन सादर केले होते. तसेच सदाशिवनगर शेवटचा क्रॉस येथील नागरी समस्या त्यांच्या कानावर घातल्या होत्या.
मात्र त्यांच्याकडून देखील अद्यापपर्यंत कोणतीच कार्यवाही झालेले नाही. नाल्या संदर्भातील तक्रारींची दखल घेतली जात नसल्यामुळे आता घराघरात सांडपाणी शिरल्यानंतरच या नाल्याची सफाई केली जाणार का? असा संतप्त सवाल स्थानिकांकडून केला जात आहे. तसेच लवकरात लवकर नाल्याची सफाई करण्याची मागणी होत आहे.