कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी हिंडलगा येथील निवडणूक आयोगाच्या गोदामातील इलेक्ट्रॉनिक होटिंग मशीन्स (ईव्हीएम) बेळगाव जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदारसंघात पाठवण्याची प्रक्रिया आज बुधवारी स्वतः जिल्हा निवडणूक निर्वाचन अधिकारी तथा जिल्हाधिकारी नितेश पाटील यांच्या उपस्थितीत कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत पार पडली.
हिंडलगा येथील निवडणूक आयोगाच्या गोदामात काल मंगळवारी ईव्हीएम मशीन्सचे विधानसभा मतदारसंघनिहाय वर्गीकरण करण्याचे काम पूर्ण करण्यात आले होते. त्यानंतर आज बुधवारी पहाटेच महापालिका तसेच अन्य शासकीय विभागातील संबंधित निवडणुकीसाठी नियुक्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना हिंडलगा येथील गोदामात हजर राहण्यास सांगण्यात आले होते.
या सर्वांच्या उपस्थितीत स्वतः जिल्हा निवडणूक निर्वाचन अधिकारी तथा जिल्हाधिकारी नितेश पाटील यांच्या देखरेखीखाली आज बुधवारी बेळगाव जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदारसंघात ईव्हीएम मशीन्स धाडण्यात आल्या. यावेळी प्रत्येक मतदार संघाच्या निवडणूक निर्वाचन अधिकाऱ्यांकडे मागणीनुसार ईव्हीएम मशीन्स सुपूर्द करण्यात आले.
जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदारसंघात एकूण 5321 मतपत्रिका केंद्र आणि 5321 नियंत्रण केंद्र असणार असून 5765 व्हीव्हीपॅटचे वाटप केले जाणार आहे. क्रमांक असलेले स्टिकर्स लावून एका ट्रंकेत सील बंद करून ही मशीन्स संबंधित मतदान केंद्रांना चोख सुरक्षा व्यवस्थेत पोहोचविली जाणार आहे. त्याचप्रमाणे ईव्हीएम मशीन्स आज जीपीएसने सुसज्ज अशा कंटेनर वाहनातून कडक पोलीस बंदोबस्तात प्रत्येक मतदारसंघात धाडण्यात आली. ईव्हीएम मशीन्सचे वितरण आणि वाहतूक प्रक्रिया पारदर्शी व्हावी यासाठी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनाही निमंत्रित करण्यात आले होते. जिल्ह्यातील प्रत्येक मतदारसंघात ईव्हीएम मशीन ठेवण्यासाठी स्ट्रॉंग रूम तयार करण्यात आले आहेत. कांही ठिकाणी जुने स्ट्रॉंग रूम आहेत, तर कांही ठिकाणी नवे तयार करण्यात आले आहेत. जेथे नवे स्ट्रॉंग रूम तयार करण्यात आले आहेत त्यांचे काम कालच पूर्ण करण्यात आले आहे. त्यामुळे आज ईव्हीएम मशीन सर्व ठिकाणी पाठवणे शक्य झाले आहे. सर्व मतदार संघातील मतदान केंद्रांवर केंद्र क्रमांक घालण्याचे कामही निवडणूक विभागाकडून पूर्ण करण्यात आले आहे.
आता प्रत्येक मतदारसंघातील उमेदवारांची संख्या निश्चित झाल्यानंतर त्यानुसार ईव्हीएममध्ये त्यासंबंधीची माहिती अपडेट केली जाणार आहे. त्यानंतर निवडणुकीच्या आधी ईव्हीएम प्रत्येक मतदान केंद्रावर पाठविले जाणार आहेत.
बेळगावात आधी ईव्हीएम किंवा मतपेट्या ठेवण्यासाठी एपीएमसी येथील गोदामाचा वापर केला जात होता. मात्र आता निवडणूक विभागाकडून हिंडलगा येथे स्वतंत्र गोदाम बांधण्यात आले आहे. या गोदामात दोन महिन्यापूर्वीच ईव्हीएम मशीन आणून ठेवण्यात आले होते.