Thursday, January 9, 2025

/

चिरमुरे तुरमुरे….

 belgaum

शिष्य : गुरुजी, अनेक अहवाल असे बाहेर पडलेत कि, आता राज्यात सत्तापालट होईल, असे चिन्ह आहे. तुमचं काय मत आहे?
गुरुजी : वत्सा, हे जे अहवाल देतात, त्यांच्या प्रामाणिकपणावर अजून प्रश्नचिन्ह आहे!
शिष्य : गुरुजी, असं कसं म्हणता तुम्ही?
गुरुजी : अरे बाबा, मीडिया कुठं राहिलाय पहिल्यासारखा प्रामाणिक? ‘ज्याचं खावं त्याचं गावं’! अशी धारणा आहे त्यांची!
शिष्य : मग सत्ताधारी खायला काही देऊ शकत नाहीत का? आता ते सगळीकडे पेरत सुटलेत..!
गुरुजी : अरे त्यांचं ते होईलच ना.. तोवर वाट बघ… तुला एवढी कशाची घाई आहे?
शिष्य : गुरुजी, आमच्या समितीचं काय होईल? याची मला चिंता आहे!
गुरुजी : अरे, समितीची चिंता आता जनतेवर नाही राहिली, ती आता देवावर आहे! नेते मनमानी वागत आहेत. आपल्या समाजाचं हीत, समाज संघटनेचं हीत न बघता त्यांचे ज्यांच्याशी संबंध आहेत त्यांचे हीत ते पाहात आहेत.

शिष्य : गुरुजी, तुम्हीच आरोप करताय?
गुरुजी : वत्सा, मी आरोप करत नाही तर वस्तुस्थिती सांगतोय! अनेक घटना घडून गेलेत! योगायोगाच्या! पंतप्रधानांच्या दौऱ्यादरम्यान इथल्या लोकांना मुंबईला नेलं! राजहंसगडावरचा कार्यक्रम घाईघाईने ४.३० वाजताच उरकला! यामागे निश्चित काय घटना होती याचा शोध लोक घेत आहेत!
शिष्य : गुरुजी, लोक आता शहाणे झालेत का?
गुरुजी : ते कधी खुळे होते वत्सा..? ते शहाणेच होते! केवळ लढत होते ते केवळ आपल्या अस्मितेसाठी. ते नेत्यांच्या पाठीमागे नव्हते! छत्रपतींच नाव घेत आपल्या मराठी भाषेसाठी लढत होते!

शिष्य : तर मग यांच्या हाती सूत्रे कशी गेली?
गुरुजी : वत्सा, बैल कुणाचाही असला तरी कासरा बांधावा लागतो. आता नेत्यांच्या हाती कासरे दिले आहेत, आता ते हाकायचा प्रयत्न करत आहेत. पण कधी शिंगावर येईल हे सांगता येत नाही!
शिष्य : शिंगावर येईल?
गुरुजी : उदाहरण खूप मोठी आहेत. हुकूमशहा गेले! हि तर वडाची पाने! कधी गळून पडतील सांगता येत नाही! काळजी करू नकोस! सगळं चांगलं होईल.
शिष्य : गुरुजी, तुम्ही आशावादी आहेत?
गुरुजी : हो!

शिष्य : उद्या आपल्या संघटनेची बैठक आहे म्हणे!
गुरुजी : हो रे.. यांच्या बैठका वारंवार घडतात. पण त्या हिताच्या घडतात का हिताच्या? हे पाहणं महत्वाचं आहे!
शिष्य : या बैठकीत नक्की ठरेल! जिथं जिथं प्रभावी मतदार संघ आहे, त्याठिकाणी आपला प्रभावी नेता उमेदवार म्हणून देण्याचा प्रयत्न करतील!
गुरुजी : वत्सा, तू अजून अडाणी आहेस, हे तुमच्या प्रभावाचे नेते निवडणार नाहीत! विरोधकांना उपयोगी ठरतील असे नेते उमेदवार म्हणून देतील! आपले खिसे भरण्याचा प्रयत्न करतील!!
शिष्य : गुरुजी, तुम्ही इतके निराशावादी आहात?
गुरुजी : नाही वत्सा, हा आजवरचा इतिहास सांगत आहे तुला.

शिष्य : गुरुजी, यावर काही निराकरण होणार कि नाही?
गुरुजी : अरे, जनता तापते, आणि मग कळत नेत्यांना, कि आपण कसं वागलं पाहिजे!
शिष्य : मग तुमचं मत काय आहे याबद्दल? गुरुजी, कसा उमेदवार पाहिजे!
गुरुजी : आपली धाव जिथवर आहे, त्यापुढे १५ हजारांची आपल्याला गरज आहे! हि १५ हजार मते बाहेरून आणणारा नेता आपल्याला पाहिजे! केवळ बडबड्या उमेदवार नव्हे तर, ज्याच्या मनगटात शक्ती असणारा नेता हवा! विरोधी उमेदवारासमोर ताकदीने उभारणारा उमेदवार हवा!

शिष्य : तुम्ही कुणाबद्दल बोलत आहात गुरुजी? कोणत्या कान्ताबद्दल बोलत आहात का?
गुरुजी : वत्सा, मी कुणाचे नाव घेत नाही! माझं एकच काम! दिशा दाखविण्याचं! गुरुचे एकच काम शिष्याला निर्देश देणे.. तुम्ही सर्वांनी त्यादिशेने वाटचाल करणे हे तुमचे काम!

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.