शिष्य : गुरुजी, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी ग्रामीण, उत्तर, दक्षिण आणि खानापूर मतदार संघात फिरून आलो आहे! या मतदार संघांचा कानोसा घेतला! आता तुम्ही म्हटल्याप्रमाणे चिरमुरे खाउयात आम्ही!! आता ग्रामीणमधील परिस्थिती मी पहिली.. राष्ट्रीय पक्षांनी अधिकाधिक ताकद लावली आहे!! प्रचंड गर्दी, शक्तिप्रदर्शनाने अर्ज भरले गेले! त्या तुलनेत आपल्या संघटनेच्या आर्किटेक्चरनेही चांगलेच शक्तिप्रदर्शन केले!!
गुरुजी : समितीची ताकद हि आतून खूप मोठ्या प्रमाणात पसरलेली आहे हे लोकांना माहित आहे. घराघरात, मनामनात माणसाच्या, शेतात, वावरात, म्हशीच्या शिंगात, बैलाच्या चाळात आणि गोठ्यात अशी सगळीकडे पसरलेली एकाच ताकद म्हणजे ‘महाराष्ट्र एकीकरण समितीची ताकद’!! ती मराठी माणसांची ताकद आहे. या मुलुखात पसरलेला मराठी माणूस हीच आमची ताकद आहे. आज लोकांना गर्दी पाहून वाटत असेल, पण त्या गर्दीचा अर्थ असा नाही, कि ती लोक दुसरीकडे कुठे गेली!! आमच्याकडे होणारी गर्दी हि महत्वाची आहे. कारण आमच्याकडे येणारी गर्दी हि पैशाने आणलेली नसते! आमची गर्दी प्रेमाने आलेली असते. त्यांच्यासाठी असेल तो व्यवहार.. पण आपल्यासाठी ‘आत्मसन्मान’ आहे! त्यामुळे इथं आलेली गर्दी हि आत्मसन्मानाची, आत्मभानाची, मराठीच्या प्रेमाची गर्दी आहे.. कुठे साड्या, कुकर, फ्रिज वाटून जमवलेली गर्दी हि खरी नसते. आणि ज्यावेळी मतदान होतं त्यावेळी आपसूक ते बटण समितीच्या नावावरच दाबलं जातं!
शिष्य : गुरुजी उत्तर मतदार संघातदेखील मी पाहिलं! राष्ट्रीय पक्षाने मराठा समाजातील नेत्याला उमेदवारी डावलली! लोक नाराज आहेत. राष्ट्रीय पक्षांचे सर्वच उमेदवार नवखे आहेत! आणि समितीचा उमेदवार देखील पहिल्यांदाच निवडणुकीत उतरत आहे!!
गुरुजी : शिष्या, तू लक्षात ठेव! यावर्षीची उत्तर ची निवडणूक संघटनेने ठरवलं तर यशापर्यंत जाणारी आहे, हे शंभर टक्के निश्चित आहे. लोकांच्या मनात महाराष्ट्र एकीकरण समितीचा उमेदवार जाऊन बसलेला आहे. त्या लोकांना या परिस्थितीच भान आलेलं आहे. आणि त्यांना शंभर टक्के पाहिजे आहे तो महाराष्ट्र एकीकरण समितीचा उमेदवार…! एकंदर परिस्थिती पाहता संघटनेने तिथं खूप मोठ्या प्रमाणात स्वतःची ताकद लावली पाहिजे. कारण यावेळी उत्तर मतदार संघात समितीचा उमेदवार निवडून येऊ शकतो अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. कागदावरच गणित तसंच सांगतं वत्सा.. हे लक्षात घे…
शिष्य : गुरुजी मग त्या झाडाच्या गावाचं काय होणार?
गुरुजी : झाडांच्या गावातील मारामारीत समितीची सत्ता येण्याची शक्यता आहे! राष्ट्रीय पक्षांमध्ये बंडाळी माजली आहे. सगळीकडे बंडखोरी झालेली आहे. या परिस्थितीत एकसंघ असणारी संघटना हि महत्वाची ठरते. इथून जाणारी एकीची कुमक आणि प्रत्येक माणसाला सोपवलेला आपला हक्क, या जीवावर संघटनेचा उमेदवार इथं यशस्वी होऊ शकतो. संघटनेच्या उमेदवारानं एकच केलं पाहिजे, प्रत्येक घटकाला बरोबरीने घेऊन जाण्याची प्रक्रिया राबविली पाहिजे.
शिष्य : विद्यमान आमदारांबद्दल नाराजी आहे तिथं..
गुरुजी : दुसऱ्याच्या नाराजीचा आमच्या संघटनेशी काही संबंध नाही! आम्ही ज्यावेळी एकी करतो त्यावेळी आम्ही निवडून येतोच येतो!
शिष्य : गुरुजी, उरला कांताचा मतदार संघ.. त्यालापण फेरफटका मारला मी..
गुरुजी : कांताच्या मतदार संघाचा एकाने काढलेला आढावा माझ्या कानावर आलेला आहे. तो गुपित आहे. पण एकच लक्षात ठेवायचं कि कांताचा हा आढावा जर लोकांनी ऐकला तर तो इतका वेगळ्या पद्धतीचा असेल कि कांता सहज निवडून येऊ शकेल!! अशी परिस्थिती निवडून येऊ शकते. कांताच्या स्वतःच्या संघटनेचं असलेलं मजबूत, बळकट मनगट त्याबरोबर मराठीच पुस्तक कांताने हातात घेतलेलं आहे. त्यामुळे हि परिक्षा कांता पास होणारच! यात काही शंकाच नाही!
शिष्य : गुरुजी मग आता मी काय शिकायला हवं…?
गुरुजी : सर्वसमावेशकता राहणे, आपली शक्ती ओळखणे, दुसऱ्याच्या कमकुवत बाजू हेराने आणि गडाचा कोणता चिरा ढिला आहे ते शोधणे, कुठं बेदिली होऊ शकते कुठला माणूस फुटू शकतो.. हे सगळं तपासून पाहून गरजेचं असत! किल्ला कितीही मजबूत असला तरी गडकऱ्याच्या चौकस बुद्धीवर गडाची सुरक्षितता असते! आणि म्हणून प्रत्येक बुरुजावरचा सैनिक, प्रत्येक तटावरचा सैनिक हा मजबूत असला पाहिजे! केवळ गडकऱ्यावरच अवलंबून न राहता प्रत्येक सैनिकाने आपलं काम चोख बजावणं गरजेचं आहे.
शिष्य : गुरुजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय पक्षांचं काय?
गुरुजी : त्यांची भाकरी त्याच्यावरच अवलंबून आहे… तिथं खूप आवक जावक होतं राहते. आलेल्या माणसांना कामाला लावणं हे त्यांचं कर्तव्य आहे! त्यामुळे ते आले आणि त्यांचा प्रचार केला तर आम्हाला काहीही फरक पडत नाही. राष्ट्रीय पक्षांना सुद्धा कळूदे कि तुम्ही येण्याने आम्हाला काही फरक पडत नाही. आलात तर या. तुम्ही प्रचार करणार असाल तर करा! आम्ही तुमचा निषेध करणार हे सांगितलेलं आहे. तुम्हाला खरमरीत पत्रही लिहिली आहेत. पण एक लक्षात ठेवा. तुम्ही येऊन प्रचार केल्याने काहीच फरक पडणार नाही.
शिष्य : गुरुजी, तुम्ही अधिक अतिआत्मविश्वासाने बोलत नाही आहेत का? इतका अतिआत्मविश्वास कुठून आला तुमच्याकडे?
गुरुजी : आमच्या संघटनेची ताकद आत्मविश्वासातच आहे…!आम्ही हनुमानाचे भक्त आहोत! आम्हाला आमची ताकद स्वतःला सांगावी लागते. आम्हाला आमची ताकद ज्यावेळी समजेल त्यावेळी लंका दहन केल्याशिवाय राहत नाही!
शिष्य : गुरुजी, तुमच्या संघटनेत मागील वेळी बंडाळी माजली होती. आता एकदमच एवढं मतांतर पार करणं शक्य आहे का?
गुरुजी : बंडाळी हि माजते कधीही! पण संघटना त्यावेळी मोठी असते. आमची संघटना अफाट मोठी आहे. पक्ष नव्हे हि संघटना आहे. हा मोर्चा आहे. हे आंदोलन आहे. आणि ६६ वर्षे अशापद्धतीने आंदोलन ठेवणं हि जगाच्या इतिहासातील अनोखी घटना आहे. या अनोख्या घटनेला सामोरे जाताना आमच्यात काही बंडखोर निघाले, काही गेले काही आले! संघटनेनं त्याचा कधी विचार केला नाही. संघटना लढत राहिली.
शिष्य : तुमचं ज्ञान आणि माहिती मला ज्ञात आहे गुरुजी! मी मतदार संघात फिरूनदेखील मला विश्वास बसेना तुम्हाला इतका आत्मविश्वास कसा? असा प्रश्न पडतोय मला!
गुरुजी : मी मराठी माणसाचं मन वाचू शकतो. मला माहीत आहे मराठी माणसाला आपला माणूसच उमेदवार हवा आहे. हि लढाई त्यांनी आपल्या भाषेसाठी ६६ वर्षे जिवंत ठेवलेली आहे. याला कुठल्या पैशांचा किंवा सत्तेचा आधार नव्हता. आधार होता तो केवळ जनमानसाचा. आणि हाच जनमाणूस हि संघटनेची ताकद आहे. जोवर जनमाणूस संघटनेत आहे तोवर संघटनेचं तसूभरही वाकड होऊ शकत नाही!
शिष्य : आभारी आहे गुरुजी!! आणखी एखादा फेरफटका मारून येतो…
गुरुजी : साध्या साध्या आणि छोट्या छोट्या माणसांना भेटा .. त्यांना आपल्या संघटनेचं महत्व माहीतच आहे. त्यांच्या गोष्टींना प्राधान्य द्या….