आपल्या मोटारीने महाराष्ट्रातून बेळगावला येत असलेल्या एका कंत्राटदाराकडून 18 लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आल्याची घटना काल शुक्रवारी बाची चेकपोस्ट येथे घडली असून प्राप्तिकर विभागाकडे पैसे व तपास वर्ग करण्यात आला आहे.
याबाबतची थोडक्यात माहिती अशी की, महाराष्ट्रातून आपल्या मोटारीने बेळगावकडे निघालेल्या एका कंत्राटदाराला संशयावरून बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्याच्या अखत्यारीतील बाची चेकपोस्टच्या ठिकाणी अडविण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी केलेल्या चौकशी दरम्यान कंत्राटदारांकडून समर्पक उत्तरे मिळाले नाहीत. याखेरीज मोटारीतील रोख 18 लाख रुपयांच्या रकमेबाबत तो आवश्यक कागदपत्रेही सादर करू शकला नाही. परिणामी सदर रोकड जप्त करण्यात आली. विधानसभा निवडणुकीनिमित्त बेळगाव जिल्ह्यात विविध ठिकाणी चेकपोस्ट स्थापना बरोबरच भरारी पथकेही कार्यान्वित झाली आहेत. या पथकांकडून निवडणुकीपूर्वीच 4 कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम जप्त करण्यात आली असून त्यामध्ये कालच्या 18 लाख रुपयांची भर पडली आहे.