निवडणूक आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी राज्याच्या मजुराई मंत्री शशिकला जोल्ले यांच्या विरोधात निपाणी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
निपाणी येथील सरकारी माध्यमिक शाळेत गेल्या बुधवारी सायंकाळी 5 ते रात्री 10 वाजेपर्यंत आयोजित हळदीकुंकू समारंभात राज्याच्या मजुराई मंत्री शशिकला जोल्ले यांनी भाग घेतला होता.
या समारंभाला उपस्थित शेकडो महिलांसाठी भोजन आणि सांस्कृतिक कार्यक्रमाची व्यवस्था करण्यात आली होती. याखेरीज समारंभाच्या ठिकाणी आवारात विद्यमान खासदार अण्णासाहेब जोल्ले यांची छायाचित्रे आणि भाजपचे झेंडे लावण्यात आले होते असे कळते. गेल्या बुधवारी कर्नाटक विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे आचारसंहिता भंग केल्याच्या कारणास्तव मंत्री जोल्ले यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
त्याचप्रमाणे रणरागिणी महिला मंडळाच्या अध्यक्षांविरुद्धही गुन्हा नोंदविण्यात आला आहे. निपाणी नगरपालिकेचे आयुक्त जगदीश हुलगेज्जी यांच्या नेतृत्वाखालील भरारी पथकाने हळदी -कुंकू समारंभाच्या उपलब्ध व्हिडिओच्या आधारे ही कारवाई केली आहे.