बेळगाव लाईव्ह : येत्या २५ आणि २६ एप्रिल रोजी भारतीय जनता पक्षाने विशेष महा अभियानाचे आयोजन केले आहे, अशी माहिती भाजप प्रवक्ते एम. बी. जिरली यांनी दिली.
सोमवारी भाजप कार्यालयात बोलाविण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे राज्यात २२४ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरत आहेत. भाजप हा कार्यकर्त्यांनी संघटित केलेला पक्ष असून भाजप राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि राज्य भाजप अध्यक्ष नलिनकुमार कटील यांच्या नेतृत्वाखाली विशेष महा अभियान आयोजिण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
भाजपचे राष्ट्रीय आणि राज्यातील नेते प्रचारात सहभाग घेणार असून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान, स्मृती इराणी, राजनाथ सिंग, निर्मला सीतारामन, मुख्यमंत्री बसवराज बोम्मई, माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा आदींसह ९८ राष्ट्रीय नेते राज्यात दोन दिवस प्रचारासाठी येणार असल्याचे ते म्हणाले.
यामध्ये बेळगाव उत्तर मतदार संघात बिहारचे संजीव चौरासिया, दक्षिण मध्ये उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य, बेळगाव ग्रामीण मतदार संघाच्या प्रचारात बिहारचे खासदार हरीश द्विवेदी, कित्तूर येथे सिद्धार्थ शिरोळ, सौंदत्ती येथे नरेंद्रसिंग तोमर, निपाणी येथे केंद्रीय मंत्री अन्नपूर्णा, चिकोडी-सदलगा येथे राजकुमार चौहार, अथणी संगीत यादव, कागवाद मनोज मंगोरकर, कुडची येथे महाराष्ट्राचे मंत्री विजयकुमार देशमुख, रायबागमध्ये जयकुमार रावळ, हुक्केरी शिवाजीराव बाळव, यमकनमर्डी येथे नवाब सिंग आदी नेते उपस्थित राहणार आहेत.
याचप्रमाणे यमकनमर्डी मतदार संघाच्या प्रचारासाठी अभिनेते सुदीप यांनाही आमंत्रित करण्यात आल्याचे ते म्हणाले. यावेळी डबल इंजिन सरकारच्या योजना, राज्य सरकारच्या विविध उपक्रमांची माहिती हे नेते देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाही दौरा होण्याची शक्यता असून २९ एप्रिल रोजी हारुगिरी येथे पंतप्रधान येणार असल्याचे त्यांनी सांगितले. केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या नेतृत्वाखाली सभेचे आयोजन करण्यात येणार असून पंतप्रधानांसह उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्रीही या कार्यक्रमालाही परवानगी मिळविण्याचे प्रयत्न सुरु असल्याचे ते म्हणाले. यावेळी भाजप ग्रामीण चे जिल्हाध्यक्ष संजय पाटील, शरद पाटील, एफ एस सिद्देगौड आदी उपस्थित होते.