बेळगावमध्ये आज सोमवारी जिल्हास्तरीय भाजप कोर कमिटीची बैठक अचानक बोलविण्यात आली. खाजगीत पार पडलेल्या या बेळगाव शहर, ग्रामीण आणि चिक्कोडी अशा तीन संघटनात्मक जिल्ह्यांच्या या संयुक्त कोर कमिटी बैठकीचे नेतृत्व केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी आणि भाजपचे उपाध्यक्ष निर्मलकुमार सुराणा यांनी केले.
जिल्हास्तरीय भाजप कोअर कमिटीच्या या बैठकीस माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी आणि माजी जलसंपदा मंत्री रमेश जारकीहोळी हे देखील उपस्थित होते. याखेरीस जिल्ह्यातील 11 मतदारसंघांमधील भाजपचे विद्यमान आमदार, दोन खासदार आणि एका राज्यसभा सदस्याने बैठकीस हजेरी लावली होती.
विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघातून तीन इच्छुकांची निवड केली जाणार असून त्यांची यादी राज्य निवड समितीकडे पाठवले जाणार आहे. बेळगाव जिल्ह्यातील 18 पैकी 15 मतदारसंघ जिंकण्याचे भाजप हाय कमांडचे लक्ष्य आहे.
आजच्या बैठकीनंतर प्रसार माध्यमांशी बोलताना केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी म्हणाले की, बेळगावचे सर्व 18 मतदार संघ भाजपने जिंकले पाहिजेत या पार्श्वभूमीवर सर्वांशी समोरासमोर बोलणी झाली आहेत.
कांही गोंधळ झाल्यास तो दुरुस्त करण्यासाठी थेट माझ्याशी बोला असा सल्ला मी दिला आहे. आम्ही येत्या 8 एप्रिल रोजी भाजपची पहिल्या टप्प्यातील उमेदवारी यादी जाहीर करणार आहोत असे सांगून त्या अनुषंगाने बेंगलोर येथे होणाऱ्या कमिटीच्या बैठकीत पुढील निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती मंत्री जोशी यांनी दिली.