कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत उमेदवारांची यादी येत्या आठवड्याभरात जाहीर केली जाईल अशी माहिती मंत्री बी. श्रीरामुलू यांनी आज शनिवारी दिली.
बेळ्ळारी येथे ते प्रसार माध्यमांशी बोलत होते. मंत्री बी. श्रीरामुलू म्हणाले की, काल आम्ही राज्यातील सर्व मतदारसंघातून उमेदवारी कोणाला द्यावी याविषयी मतं गोळा केली आहेत. त्यावर कोर कमिटीमध्ये चर्चा करून ती केंद्रातील नेत्यांकडे हाय कमांडकडे पाठवून दिली जाईल.
भाजप सरकारने सर्व समाजाला आरक्षण देऊन सामाजिक न्याय दिला असल्यामुळे राज्यात पुन्हा भाजपचे सरकारी येईल, असा विश्वास व्यक्त करून डी. के. शिवकुमार आणि सिद्धरामय्या यांच्यावर टीका करताना त्यांनी ते सत्ते येण्याची स्वप्न पहात आहेत. परंतु त्यांचा हा प्रयत्न निष्पय ठरणार आहे असे सांगितले. तसेच खुर्चीच्या हव्यासापोटी ते राजकारण करत आहेत असा आरोप त्यांनी केला.
आमदार एन. वाय. गोपालकृष्ण यांनी भाजपचा राजीनामा दिला आहे. या संदर्भातील पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना गोपालकृष्ण हे ज्येष्ठ नेते आहेत. ते आमचा पक्ष सोडून गेल्याचे आम्हाला दुःख आहे. तथापी कुडलिगी मतदारसंघात आमचा पक्ष मजबूत असल्यामुळे यावेळी आम्ही पुन्हा विजयी होऊ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
बेळ्ळारी ग्रामीण मतदार संघातून आपण चार वेळा विजयी झालो आहोत. गेली 30 वर्षे हीच माझी जन्मभूमी, कर्मभूमी आणि धर्मभूमी आहे. या क्षेत्रातील लोक माझ्या पाठीशी राहतील. बेळ्ळारी ग्रामीण मतदार संघातून निवडणूक लढवण्याचा निर्णय हा माझा वैयक्तिक आहे. मी माझी भूमिका पक्षातील ज्येष्ठांना कळविले आहे असे मंत्री श्रीरामुलू म्हणाले. काँग्रेस नेत्यांना धमक्या देऊन भाजपमध्ये प्रवेश केल्याच्या मुद्द्यासंदर्भात बोलताना एकाधिकारशाही व्यवस्थेविरुद्ध लढा देणारे आम्ही आहोत.
मी अशा विधानांना प्रतिसाद देत नाही असेही श्रीरामुलू यांनी स्पष्ट केले. तसेच भाजपची बहुप्रतिक्षित उमेदवार यादी येत्या आठवड्याभरात जाहीर होईल, अशी अपेक्षा मंत्री बी. श्रीरामुलू यांनी व्यक्त केली.