माझ्यावर अन्याय झाला हे मान्य असले तरी मी भाजपचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे आणि हायकमांडचा निर्णय माझ्यासाठी शिरसावंद्य आहे असे स्पष्ट करताना यावेळीही भारतीय जनता पक्षाला विजयी करण्याचा आम्ही निर्धार केला असून कार्यकर्त्यांसह समस्त जनतेने आम्हाला सहकार्य करावे, असे आवाहन बेळगाव उत्तर मतदार संघाचे आमदार ॲड. अनिल बेनके यांनी केले.
शहरात आज सोमवारी सकाळी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. माजी आमदार ॲड. बेनके म्हणाले की, भाजप ही कार्यकर्त्यांची संघटना आहे. जात-पात, भाषा भेद वगैरे न करता मागील वेळी मला उमेदवारी देण्यात आली होती. त्यावेळी आपण सर्वांनी संघटितपणे कार्य केल्यामुळे आपला विजय शक्य झाला. तेंव्हापासून गेली 5 वर्षे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली ‘सबका साथ सबका विकास’ या घोषवाक्यखाली मी माझ्या मतदार संघात अनेक जनहितार्थ विकास कामे केली आहेत. हे करत असताना कोणताही भेदभाव केलेला नाही. कोणालाही त्रास होऊ नये, कोणावर अन्याय होऊ नये या भावनेने मी कार्य केले आहे. या पद्धतीने चांगल्या प्रकारे कार्य केल्यानंतर यावेळी हायकमांडने बेळगाव उत्तर मतदारसंघात बदल घडवताना डॉ. रवी पाटील यांना उमेदवारी दिली आहे आम्ही सर्वांनी चर्चा करून डॉ. पाटील यांना निवडून आणण्याचा निर्धार केला आहे. तेव्हा भाजप कार्यकर्त्यांसह जनतेला माझी विनंती आहे की त्यांनी आपण स्वतः उमेदवार आहोत असे समजून भारतीय जनता पक्षासोबतच रहावे असे सांगून यावेळी ही भाजप उमेदवाराला निवडून आणण्याचा आम्ही निर्धार केला आहे त्याला सर्वांनी सहकार्य करावे, असे ॲड. अनिल बेनके म्हणाले.
तुम्ही विकास कामे केली तर तुम्हाला का डावलले? कोणत्या निकषावर तुमच्या ऐवजी दुसऱ्या उमेदवाराची निवड करण्यात आली? या पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना तो निर्णय पक्षाच्या वरिष्ठांनी हायकमांडने घेतला असल्याचे सांगून बेनके यांनी स्पष्टीकरण देणे टाळले. मात्र पत्रकारांनी वारंवार छेडले असता आपल्यावर अन्याय झाल्याचे त्यांनी शेवटी मान्य केले.
अन्याय झाला असला तरी मी भाजपचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे आणि हायकमांडचा निर्णय माझ्यासाठी शिरसावंद्य आहे. यापूर्वी मी भाजपचा निष्ठावंत कार्यकर्ता होतो, आज आहे आणि यापुढेही कायम राहीन, असे माजी आमदार ॲड. अनिल बेनके यांनी शेवटी स्पष्ट केले. पत्रकार परिषदेस बेळगावच्या खासदार मंगल अंगडी यांच्यासह भाजपचे अन्य नेते व पदाधिकारी उपस्थित होते.